Mon, May 27, 2019 09:46होमपेज › Sangli › बेपत्ता मुलगा दोन तासात सापडला

बेपत्ता मुलगा दोन तासात सापडला

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 11 2018 1:08AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील पंचशीलनगरमधील आशिष संतोष काटकर (वय 15) शुक्रवारी सकाळपासून अचानक बेपत्ता झाला. दुपारी त्याने एका माणसाने त्याला पुण्याला नेल्याचा मेसेज घरच्या मोबाईलवर केला. नंतर त्याच्या वडिलांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजयनगर पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. नंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून आशिषला रात्री साडेसात वाजता पुणे रेल्वे स्थानकावर नातेवाईक पाठवून ताब्यात घेतले. 

आशिष पंचशीलनगरमध्ये कुटुंबासमवेत राहतो. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तो व्यायामला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. जाताना त्याने घरातला मोबाईलही नेला होता. दुपारपर्यंत तो घरी परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. दुपारी अडीचच्या सुमारास त्याने एका माणसाने आपल्याला पुण्याला आणल्याचा मेसेज केला. नंतर काहीवेळाने लवकर घरी परत येतो. तो माणूस सोबत असल्याने मी कॉल करू शकत नाही, असाही मेसेज केला. यामुळे घरचे काळजीत पडले. 

त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्या वडिलांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी तातडीने हालचाली करून याबाबत उपअधीक्षक अशोक वीरकर यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सायबर सेलला आशिषचा मोबाईल क्रमांक कळवून त्याचे लोकेशन काढण्यात आले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात त्याचे लोकेशन मिळाले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तातडीने आशिषच्या नातेवाईकांना पुणे रेल्वे स्थानकावर पाठविले. रात्री साडेसातच्या सुमारास तेथे तो सापडला. 

त्यानंतर पोलिसांचे एक पथक तातडीने पुण्याला पाठविण्यात आले. त्याला घेऊन शनिवारी रात्री पथक सांगलीत परतले आहे. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याने शाळेला सुट्या असल्याने असेच फिरत पुण्याला गेलो होतो, असे सांगितले. तसेच गंमत म्हणून एका माणसाने पुण्याला नेल्याचा मेसेज केल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी तत्परतेने हालचाली करून त्याचा माग काढल्याने तो सुखरूप घरी पोहोचला. यामुळे त्याच्या घरच्यांचा जीव भांड्यात पडला. 

आधुनिक यंत्रणेचा तत्पर वापर...

पोलिसांकडे गुन्ह्यांशी संबंधित शोधासाठी अनेक आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. आशिष बेपत्ता झाल्यानंतर सायबर सेलच्या माध्यमातून त्याचे लोकेशन काढून त्याला तातडीने शोधण्याचे काम पोलिसांनी अत्यंत तत्परतेने केले. या घटनेमुळे पोलिसांनी मनात आणले तर कोणत्याही गुन्ह्याची उकल तातडीने होऊ शकते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोलिसांनी अशीच तत्परता सर्वच गुन्ह्यांबाबत दाखवावी, अशीच आता सांगलीकरांची अपेक्षा आहे.