Thu, Jul 18, 2019 04:33होमपेज › Sangli › मुख्य संशयिताला कोल्हापुरात अटक

मुख्य संशयिताला कोल्हापुरात अटक

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:34PMसांगली/कोल्हापूर 

सांगली विश्रामबाग येथील रत्ना हॉटेल समोर  वाहतूक पोलिस  समाधान मांटे यांच्या  खूनप्रकरणी  मुख्य संशयित झाकीर अझमुद्दीन जमादार (वय 31, रा. विश्रामबाग) याला कोल्हापुरात अटक करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री शाहू टोल नाका परिसरात तो येणार असल्याची माहिती मिळाल्याने जुना राजवाडा पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. दरम्यान, या प्रकरणी सांगली पोलिसांनी जमादार याचा मेहुणा वासीम शेख याला ताब्यत घेतले आहे.  या आधी अटक केलेले राजू उर्फ अख्तर नदाफ  आणि अन्सार  पठाण यांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी दिली आहे. 

मांटे या पोलिसाचा  अकरापेक्षा अधिक वार करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित झाकीर जमादार पसार झाला होता. सांगली पोलिस  दोन दिवस त्याचा शोध घेत होते. बुधवारी मध्यरात्री तो राष्ट्रीय महामार्गावरुन कर्नाटकाकडे जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे यांना मिळाली. मध्यरात्री दोनच्या सुमारास पथकासह ते शाहू नाका परिसरात थांबले होते. काही वेळातच झाकीर जमादार तेथे आला. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पकडले. याआधी राजू उर्फ अख्तर नदाफ (29), अन्सार अजिज पठाण (30, दोघे रा. हडको कॉलनी, सांगली) या दोघांना अटक झाली आहे.झाकीर उच्चशिक्षित असून त्याने अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले आहे. या कारवाईत  सहायक निरीक्षक किरण भोसले, एकनाथ चौगले, प्रितम मिठारी, सुहास पोवार, सचिन देसाई, जुबीन शेख, संताजी चव्हाण, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला. झाकीरला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

दारुच्या वादातूनच खुनाची जमादारची कबुली

जमादार हा  काऊंटरवर दारू पीत उभा होता.  त्यावेळी  मांटेबरोबर त्याची बिलाच्या कारणावरून वादावादी झाली. त्यातून मांटे यांनी झाकीरच्या कानशिलात लगावल्या. नंतर त्यांच्यातील वाद वाढत गेला.  त्यातून जमादार याने मांटे यांच्यावर रागाच्या भरात वार केले, अशी कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.