Tue, May 21, 2019 22:34होमपेज › Sangli › झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुख्य प्रश्‍न

झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुख्य प्रश्‍न

Published On: May 29 2018 1:32AM | Last Updated: May 28 2018 7:27PMसांगली : प्रतिनिधी

पन्नास टक्के झोपडपट्टीचा भाग असणारा प्रभाग क्रमांक दहा. अनेक समस्यांनी वेढला आहे. झोपडपट्टीसह उच्चभ्रू वसाहतीही या प्रभागात आहेत. मात्र झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, नाल्यांचे काँक्रिटीकरण हे या प्रभागात महत्वाचे प्रश्‍न आहेत.  कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, स्वच्छतेचा अभाव,  डुकरांचा सुळसुळाट यामुळे येथील आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर आहे.  प्रभाग क्रमांक दहामधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. मात्र त्याचे लाभार्थी अद्यापही निश्‍चीत झालेले नाहीत. आहे त्या जागेवर बहुमजली इमारत उभारून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रश्‍न मार्गी लावण्याचे आव्हान नवीन नगरसेवकांसमोर असणार आहे. याच प्रभागात मीरा हाऊसिंग सोसायटीच्या पूर्व-उत्तर भागातून एक मोठा नैसर्गिक नाला वाहतो. नागरी वस्तीतून जाणार्‍या या नाल्यावर अनेक अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी हा नाला तुंबून लोकांच्या घरात पाणी शिरते.

त्यामुळे या परिसरात आरोग्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या नाल्याला अनेक ठिकाणी गटारी, छोटे नाले मिळतात, त्यामुळे तो बंदिस्त करता येत नाही. पण त्याचे काँक्रिटीकरण महत्वाचे आहे. काँग्रेस भवन ते रेल्वे स्टेशन असा 80 फुटी रस्ता विकास आराखड्यात आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त वडर कॉलनीपर्यंत हा रस्ता करण्यात आला आहे.  रस्त्याचे काँग्रेस भवनपर्यंत काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे   मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. गोकुळनगर परिसर तर अस्वच्छतेचे आगर बनले आहे. बालहनुमान नगर येथील पुनर्वसन केलेल्या घरांची दुरवस्था झाली आहे.  संपूर्ण प्रभागात एकही उद्यान, विरंगुळा केंद्र नाही. सर्वोदय कॉलनीत ड्रेनेज नाही.  रस्ते, गटारांचीही दुरवस्था आहे. सर्वच सुलभ शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे.  

समस्या प्रभागाच्या 10

लोकसंख्या : 28238

परिसर : टिंबर एरिया, शिवाजी स्टेडियम, आमराई, मिरा हौसिंग सोसायटी, रतनशीनगर, उत्तर शिवाजीनगर, संजय गांधी वसाहत, भीमनगर, गोकूळनगर, बालहनुमान कॉलनी, सर्वोदय कॉलनी, माकडवाले वसाहत, रिमांड होम, माळी गल्ली, राजमाता सोसायटी.