Fri, Aug 23, 2019 14:28होमपेज › Sangli › कर्जाच्या आमिषाने डॉक्टरचा लाखोंचा गंडा

कर्जाच्या आमिषाने डॉक्टरचा लाखोंचा गंडा

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 10:01PMइस्लामपूर : वार्ताहर

वार्षिक तीन टक्के दराने नामांकित ट्रस्टचे कर्ज देण्याच्या आमिषाने वाळवा तालुक्यातील एका डॉक्टरने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. डॉक्टरच्या या आमिषाला अनेक प्रतिष्ठित, उद्योजक, व्यापारी बळी पडल्याची चर्चा आहे. आजपर्यंत एकालाही कर्ज मात्र मिळालेले नाही.  

कृष्णा काठावरील एका सधन गावात वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या या गृहस्थांनी गेल्या काही वर्षांपासून कर्जाच्या आमिषाने लोकांना गंडा घालण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. या आमिषाला अनेक श्रीमंत लोक बळी पडले आहेत. नामांकित ट्रस्टचे हवे तेवढे  कर्ज मिळवून देतो. तेही केवळ वार्षिक 3 टक्के दरात, असे सांगून या डॉक्टरने जेवढे कर्ज हवे आहे त्याच्या 3 टक्के रक्कम प्रोसेस फी म्हणून लोकांच्याकडून घेतली  आहे असे सांगितले जाते. 

अनेकांनी नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी, घरबांधणीसाठी तसेच जुने कर्ज फेडण्यासाठी 25 लाख, 50 लाख, कोटी, दीड कोटी कर्जाची मागणी करीत त्या रकमेच्या तीन टक्के प्रोसेस फी या डॉक्टरला दिली आहे. असे तालुक्यात 20 ते 22 लोक आहेत.  त्यांची ही कमिशनपोटी घेतलेली  रक्कम कोटीच्या घरात जात आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून पैसे दिलेले लोक कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना या महाशयाने काहीच दाद दिलेली नाही. पैसे घेतलेल्या लोकांचे तो फोनही  उचलत नाही. त्यामुळे काहींनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर काहीजण आता तक्रार देण्याच्या तयारीत 
आहेत. 

कर्जाच्या आमिषाने आणखी कर्जात...

या ट्रस्टचे कमी व्याजदरात कर्ज मिळते यावर विश्‍वास बसण्यासाठी हा डॉक्टर संबंधित लोकांना त्या ट्रस्टचा डी.डी., धनादेश दाखवितो. त्यामुळे अनेकजण त्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. कर्जाची मागणी करणार्‍यांमध्ये व्यापारी, उद्योजक, राजकारणी व प्रतिष्ठित लोकांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. काहींनी तर व्याजाने रक्कम उचलून या डॉक्टरला दिली आहे. त्या लोकांचा आता कर्जाच्या आमिषाने आणखी कर्जात पाय बुडाला आहे.