Fri, Jul 19, 2019 05:53होमपेज › Sangli › प्रेमी युगुलाला छेडणार्‍याचा भावशाने खून केल्याचे उघड

प्रेमी युगुलाला छेडणार्‍याचा भावशाने खून केल्याचे उघड

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 14 2018 1:40AMसांगली : प्रतिनिधी

रेठरेधरण (ता. वाळवा) येथे खतरनाक गुंड भावशा पाटीलने चाकण येथे प्रेमी युगुलाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून धमकावणार्‍या एकाचा डोक्यात दगड घालून खून केला होता. 2011 मध्ये ही घटना घडली होती. त्यातील मृताची ओळख पटलेली नाही. त्या मृताकडील रिव्हॉल्वर भावशाने चोरले होते. त्या रिव्हॉल्वरनेच त्याने संताजी खंडागळे यांचा खून केला होता. या घटनेच्या तपासासाठी सांगलीचे गुंडा विरोधी पथक चाकणला जाणार आहे. 

रेठरेधरण येथील धनाजी पाटील, संताजी खंडागळे यांच्यासह विट्यातील गुंड संजय कांबळे यांच्या खुनाचे तीन गुन्हे भावशावर दाखल आहेत. चाकणमधील खुनामुळे त्याच्या नावावर चार खुनांची नोंद होणार आहे. 1 डिसेंबर 2016 रोजी खंडागळे यांचा खून केल्यानंतर भावशा फरार झाला होता. त्याला पंढरपूर पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने चाकण येथील खुनाची कबुली दिली आहे. त्यानुसार सांगली पोलिसांचे पथक चाकणला जाणार आहे. 

दरम्यान चाकणमधील खुनाव्यतिरिक्त अन्य काही गुन्हे त्याने केले आहेत का याबाबत पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. इस्लामपूरमधून पोलिसांच्या ताब्यातून तो पळून गेल्याने सध्या त्याला कडक बंदोबस्तात पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. चाकणमधील मृताची ओळख पटल्यानंतरच त्याने दिलेल्या कबुलीनुसार पुढील तपासाला गती मिळणार असल्याचे सांगितले.