Wed, Jul 17, 2019 00:38होमपेज › Sangli › इस्लामपुरात ठेक्यांमधल्या टक्क्यांचे वादळ!

इस्लामपुरात ठेक्यांमधल्या टक्क्यांचे वादळ!

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 10:59PMइस्लामपूर : अशोक शिंदे

पालिकेची सोमवारची सभा काहीशी खेळीमेळीत झाल्याने सत्तारुढ गटात नगराध्यक्ष - गटनेत्यांमधील मतभेद म्हणजे ‘पेल्यातील वादळ’असल्याचे दिसले. अर्थात हे वादळ पालिकेतील कामांचे ठेके  अन् ठेक्यांमधल्या टक्क्यांंभोवती घोंगावत असल्याचे स्पष्ट आहे.

वर्षानुवर्षे इथल्या विकासकामांना  टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा; असे गणित मांडले तरी  आश्‍चर्य वाटू नये. गेल्या आठवड्यात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील व आघाडीचे गटनेते विक्रम पाटील यांच्यात झालेला प्रखर वाद चांगलाच गाजला. दोघा युवा बंधूतील झालेला हा आक्रमक वाद सत्तारुढ विकास आघाडीच्या भावी ऐक्यावर घाला घालणार, असे दिसत होते. 

वास्तविक शहरात आणला जात असलेला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी प्रत्यक्ष कामांवरती खर्च होत नसल्याच्या वर्षानुवर्षेच्या नुसत्या तक्रारी नव्हे तर याआधी काही घोटाळ्यांचेही खल झाले आहेत. त्या प्रत्येकवेळी आरोप-प्रत्त्यारोपांच्याफैरी झडल्या होत्या. 

आता केंद्रात, राज्यात व इस्लामपुरातही भाजपची सत्ता असताना कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याचे आव्हान नगराध्यक्ष  निशिकांत पाटील यांच्यासमोर आहे. याआधी झालेल्या विकासकामांच्याही पुढे या शहराला नेण्याची जबाबदारी शहरवासियांनी त्यांच्या टीमवर सोपविली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच नगराध्यक्ष पाटील यांचीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चांगलीच सलगी आहे. 

आता विकासनिधी आणताना पारदर्शक कारभारासाठी व विकास निधीची कामे योग्य त्या ठेकेदाराला मिळावीत म्हणून आलेल्या ‘ई-टेंडर’ पद्धतीलादेखीला कशी बगल दिली जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.  बगलबच्यांना सांभाळताना निधीची ‘वाट’ लागत असल्याचाही आरोप आहे. एकूण 25 विकासकामांपैकी 21 कामांसाठी एकाच ठेकेदाराची निविदा कशी येते, हादेखील शोधाचा विषय आहे. सत्ताधार्‍यांबरोबरच पालिकेतील अधिकारी व ठेकेदारांनी परस्परांना पोसण्याचा पायंडा सुरू केला काय, असा सवाल शहरवासिय उपस्थित  करत आहेत. 

ठेकेदारी-टक्केवारीत मुळीच रस नाही : नगराध्यक्ष पाटील

शहरात सत्तेवर येताना शहरवासियांना विकास आघाडी व मित्र पक्षांनी विकासाचे आश्‍वासन दिले आहे. ना. सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, भाजप, काँगे्रस, शिवसेना, आरपीआय अशा सर्वांनी एकत्र येवून जी जी आश्‍वासने दिली होती ती पाच वर्षात 100 टक्के पूर्ण केली जातील. ठेकेदारी व टक्केवारी यात कसलाही रस नाही. पालिकेच्या लोकशाहीच्या मंदिरात सेवेची शपथ घेवून प्रवेश केला आहे. ती शपथ 100 टक्के 5 वर्षे पाळली जाईल. विकास आणि विकासकामांचा दर्जा यावरच 100 टक्के माझा भर राहणार आहे. बाकीच्या वादांमध्ये मला मुळीच रस नाही, असे सांगून नगराध्यक्ष पाटील यांनी वादाला बगल देवून टाकली. 

अंधारात ठेवले : विक्रम पाटील

पालिकेतील वादाबाबत प्रतिक्रिया देताना गटनेते विक्रम पाटील म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी शहरात रस्त्यांसाठी जे 5 कोटी रुपये दिले. त्या कामांमध्ये नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक शहाजीबापू पाटील, संजय कोरे, विश्‍वासबापू डांगे व उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी दिलेल्या सर्व कामांचा समावेश केला. या कामांची यादी तयार करताना, राज्य शासनाकडून एवढी मोठी रक्कम येत असताना गटनेता असताना मला व इतरांना पूर्णपणे अंधारात ठेवले गेले. विरोधकांची कामे घेतल्याला माझा आक्षेप नाही. पण आम्हाला पूर्ण अंधारात ठेवले. ही बाब अतिशय गंभीर असल्याने आक्रमक होणे मला भाग पडले.