Thu, Jul 18, 2019 00:55होमपेज › Sangli › उमेदवारीबाबत इच्छुकांची ‘धाकधूक’ वाढली

उमेदवारीबाबत इच्छुकांची ‘धाकधूक’ वाढली

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:11PMमिरज : जे. ए. पाटील

महापालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दलाने अद्याप उमेदवारी निश्‍चित न केल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवस उरले आहेत. सर्वच पक्षांकडून बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडी सोबत जनता दलाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या पक्षाला कोणत्या जागा मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. असे असलेतरी उमेदवार निवडीबाबतच्या राजकीय हलचाली वाढल्या असून संभाव्य बड्या उमेदवारांनी दबावतंत्राचाही वापर सुरू केला आहे.

नगरपालिका असो अथवा महापालिका असो परंपरेने राजकीय वारसा चालविणार्‍या विविध गटांचे नेतेही सक्रिय झाले आहेत.  आपल्याच घरातील किमान दोन ते चार जणांना उमेदवारी कशी मिळेल, याबाबतची ‘फिल्डींग’ लावली आहे. अनेक प्रस्थापितांचे प्रभाग आरक्षित झाल्याने  त्यांना इतर प्रभागात उमेदवारी मिळण्याकरीता धावाधाव करावी लागत आहे. तर अनेकजण पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचीही तयारी चालविली आहे. या निमित्ताने विविध पक्ष व गटाबाबत ‘अंडरग्राउंड’ सेटलमेंटची नितीही राबविली जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून गेल्या वीस वर्षात शहराचे आणि महापालिकेचे राजकारण करणार्‍या पारंपारिक नेत्यांना मात्र यंदा बदलेल्या राजकीय परिस्थितीचा ‘धक्का’ बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी स्वतंत्र प्रभाग असायचे, त्यामुळे निवडणूक जिंकणे आणि सेटलमेंट करणे सोपे जायचे. परंतु आता चार नगरसेवकांसाठी एक प्रभाग करण्यात आल्यामुळे आणि प्रभागाची मतदार संख्या 20 ते 25 हजार पर्यंत करण्यात आल्यामुळे पारंपारिक प्रस्थापितांची ‘गडबड’ उडाली आहे.

गेल्या वीस वर्षात महापालिकेचे  सत्ताकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भोवतीच फिरत राहिले आहे. यंदा मात्र भाजप आणि शिवसेनेने सर्व तयारीनिशी या निवडणुकीत उतरले असल्याने अनेकांचे कान टवकारले आहेत. यामुळे पक्षाची उमेदवारी आणि पॅकेज मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांच्या बेडूक उड्या सुरू आहेत. कोणीही कोणत्याही पक्षात गेले तरी मतदारांनी मात्र यावेळी सर्वच पक्षातील प्रस्थापितांविरुद्ध उठाव करण्याचे ठरविले आहे. प्रस्थापितांविरुद्ध सर्वच पक्षातील दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनीही ‘आता नाहीतर पुन्हा संधी नाही’, असे म्हणून आपले अस्तित्व दाखविण्याचा आता चंग बांधला आहे. यामुळे नेत्यांनाही आता सबुरीने घ्यावे लागत आहे. परंतु कार्यकर्ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे दिसून येते. याची सुरुवात प्रभाग क्र. 6 मधून सुरू झाली आहे. रविवारी सर्व पक्षातील असंतुष्ट कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रस्थापितांविरुद्ध एकत्र येऊन सक्षमपणे लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रस्थापित नेते आणि कार्यकर्ते यांची चांगलीच ‘तंतरली’ आहे. प्रस्थापित आजी, माजी नगरसेवक, नेते यांच्या विरुद्ध यावेळी नव्या कार्यकर्त्यांकडूनही चांगलेच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे.

मतदार यादीचा घोळ अद्याप सुरूच...

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पहिल्या चार दिवसांत केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. आता केवळ तीन दिवस उरले आहेत. उमेदवारांना महापालिकेकडून अद्याप मतदार यादी उपलब्ध करण्यात आलेली नाही. अनेकांनी अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या, निवडणूक आयोगापर्यंतही तक्रारी गेल्या  परंतु याबाबत फारशी गांभीर्याने दखल घेण्यात आली नसल्याचे दिसून येते. उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करायचे असल्याने मतदार यादीही ऑनलाईन पहा, असाही सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत संभ्रमावस्थेत असून अनेकांना वकीलांचा सल्ला घ्यावा लागत आहे.