Sun, Jan 20, 2019 06:08होमपेज › Sangli › प्लास्टिक बंदीमुळे किराणा दुकानदारांची तारांबळ

प्लास्टिक बंदीमुळे किराणा दुकानदारांची तारांबळ

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 7:32PMकवठेपिरान : वार्ताहर 

राज्य शासनाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात प्लास्टिक तसेच थर्माकॉल पासून बनविण्यात येणार्‍या उत्पादनांवर व विक्री करण्यास बंदी घातली आहे. पण पर्याय उपलब्ध न केल्यामुळे किराणा दुकानदार, व्यवसायिकांची तारांबळ होत आहे.विशेषत: ग्रामीण भागामध्ये किराणा दुकानांत साखर, डाळींचे विविध पदार्थ तसेच इतर किराणा  वस्तू ग्राहकांना बांधून देण्यासाठी कोणत्या पर्यायी पिशव्यांचा वापर करावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

राज्य शासनाने पर्यावरणावर होत असलेले घातक परिणाम लक्षात घेऊन प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला, त्याचे  सर्वच स्तरांतून  स्वागत केले गेले. पण त्यावरती ठोस पर्याय उपलब्ध नसल्याने किराणा दुकानदार व नागरिकांना देखील गैरसोय सहन करावी लागत आहे. दुकानांत खरेदी केलेला किराणा माल घरी न्यायचा तर कसा, असा प्रश्न होत आहे.ग्रामीण भागामध्ये आजही  अर्धा किलो, किलो, दोन किलो अशा प्रमाणात किराणा माल खरेदी केला जातो. पण तो  नेण्यासाठी पिशवी नाही व जास्त माल खरेदी करण्याची ताकत नाही. याचा सामान्यांना फटका बसू लागला असल्याचे चित्र आहे.