Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Sangli › नीरव मोदीप्रकरणी सरकारचे दुर्लक्ष का?

नीरव मोदीप्रकरणी सरकारचे दुर्लक्ष का?

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:15PMसांगली : प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे 11400 कोटी रुपयांचा घोटाळा नीरव मोदी यांनी केला. या नीरव मोदींच्या महाघोटाळ्याची माहिती सरकारला अगोदरपासूनच होती. तर वेळीच त्याचा बंदोबस्त का केला नाही, असा सवाल काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला.  दाव्होसला नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटले. हाच का भ्रष्टाचारमुक्‍त भारत? असे ते म्हणाले. 

पाटील म्हणाले, एका बाजूला सर्वसामान्यांना आधारकार्ड बँकेशी जोडलेले नाही म्हणून बँक व्यवहारात अडवाअडवी करतात. मात्र मोदीसारख्या महाचोराला बँकेने, सरकारने आरामात सोडून दिले आहे. हा भ्रष्ट कारभार चालतोच कसा? नीरव मोदी देशातून पळून गेला कारण सरकारने, बँकेने याबाबत दुर्लक्ष करून त्याला पळून जाण्यास एकप्रकारे पाठबळच दिले आहे.

ते म्हणाले,  भाजप सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षात भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात येऊनही त्यांची चैकशी  झाली नाही. मग मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळा असो, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहाची अल्पावधीत करोडो रुपयांची संपत्ती वाढलेली असो. अनेक भांडवलदारांनी देशाची लूट चालू ठेवली आहे. 

पाटील म्हणाले, आता हे नीरव मोदीचे नवे प्रकरण समोर आले आहे. पंतप्रधान एकीकडे भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा विविध व्यासपीठावरून करतात. भांडवलदार देश लुटत आहेत. बँकांना फसवत आहेत. नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्या यांनी अकरा लाख करोडो रुपयांचा चुना लावला. तरीसुध्दा सरकार गप्प कसे? या सर्व प्रकरणांची चौकशी युध्दपातळीवर करायला हवी. या लुटारूपासून देश वाचवावा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.