Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Sangli › सरकारच्या हकालपट्टीची वेळ : खा. शेट्टी

सरकारच्या हकालपट्टीची वेळ : खा. शेट्टी

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 7:47PMमालगाव : वार्ताहर

मोदी सरकारने शेतकर्‍यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारची हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.मालगाव (ता. मिरज) येथे स्वाभिमानी विद्यार्थी संघटना व वाहतूक संघटना यांच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. बाळासाहेब होनमोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तालुकाध्यक्ष संजय खोलकुंबे उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, सरकारने डाळी व तेलबियांना हमीभाव दिला नाही. उलट अतिरिक्त उत्पन्न असताना परदेशातून आयात केल्याने शेतीमालाचे दर ढासळले. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्योगपतींना कोटींचे अनुदान दिले तर शेतकर्‍यांना कर्जमाफी  दिली नाही. कोट्यवधींचा कर विविध रूपाने शेतकरी भरत असताना कर्जमाफी का होत नाही? शेतकर्‍याला शेती फायद्यात आणायची असेल तर एक नजर शिवारात, दुसरी नजर बाजारात व तिसरी नजर राजकारणात ठेवायला हवी. 

महेश खराडे म्हणाले, सरकारची पीक विमा योजना फसवी आहे. याचा लाभ शेतकर्‍यांऐवजी विमा कंपनीला होत आहे. त्यामुळे बारमाही पीक विमा योजना सुरू केली पाहिजे. ऊस शेतकर्‍यांबरोबर द्राक्ष व बेदाणा शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत.सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, जयकुमार कोले, महावीर पाटील, सदानंद कबाडगे, महेश संकपाळ, सुहास केरीमाने, बाळू पाटील, राजू खरशिंगे-माळी, विकास देशमुख यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन स्मिता केरीमाने यांनी केले. आभार सुहास वसगडे यांनी मानले.