Thu, Jul 18, 2019 02:13होमपेज › Sangli › रोटरखाली सापडून बालिका ठार

रोटरखाली सापडून बालिका ठार

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:54PMतासगाव : शहर प्रतिनिधी

सावर्डे (ता. तासगाव) येथे बुधवारी ट्रॅक्टरच्या रोटरखाली सापडून आठ वर्षांची श्रद्धा कुंडलिक पाटील ही बालिका ठार झाली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : सध्या पावसामुळे सगळीकडेच पेरण्यांची धावपळ सुरू आहे. यासाठी सावर्डे येथे रोटर मारण्याचे काम सुरू होते.  त्यासाठी कौलगे येथील दिलीप मंडले या ट्रॅक्टरचालकाला बोलावले होते.श्रद्धा ही मूळची वायफळे येथील आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती आई व भावासह सावर्डे येथे तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. ती  दुसरीत, तर तिचा भाऊ तिसरीमध्ये शिकतो. ट्रॅक्टरचालक मंडले व श्रद्धाच्या घरचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मंडले सावर्डेत आल्यानंतर त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी श्रध्दा व तिचा थोरला भाऊ यांनी ट्रॅक्टरवरुन येण्याचा हट्ट केला.

त्यामुळे मंडले यांनी रोटर मारण्यास जाताना त्या दोघांना ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूस बसवून नेले. एका पट्टीत रोटर मारुन झाल्यानंतर दुसर्‍या पट्टीत जाताना अचानक श्रध्दाचा तोल गेला व ती थेट रोटरच्या खाली सापडली.  तिचे जागेवरच तुकडे झाले. काही समजण्याच्या आतच हा प्रकार घडला.सावर्डेचे पोलिस पाटील सुरेश खराडे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला.