Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Sangli › प्रारूप मतदार याद्या पुन्हा लांबणीवर

प्रारूप मतदार याद्या पुन्हा लांबणीवर

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धी पुन्हा गुरुवारपर्यंत (दि. 7) लांबणीवर गेली.  यासंदर्भात सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. यामध्ये गुरुवारी प्रारूप याद्या प्रसिद्ध  होणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मतदारांच्या हरकती व सूचनेनंतर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी दि. 2 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता बळावली आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रशासनाने प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर केली. आता मतदार याद्या निश्‍चितीचे काम सुरू आहे. यानुसार मंगळवारी मतदार याद्या प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्याचे आदेश आयोगाने यापूर्वी दिले होते. त्याप्रमाणे मनपा प्रशासनाने दि. 21 मेपर्यंत अस्तित्वात असलेले मतदार ग्राह्य धरून प्रभागनिहाय याद्यांचे विभाजन केले. ही यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. 

प्रशासनाने तयार केलेल्या याद्यांची निवडणूक आयोगाने ऑनलाईन तपासणी केली होती. त्यामध्ये अनेक नावे दुबार आढळली होती. काही तांत्रिक त्रुटी होत्या. या त्रुटी निवडणूक आयोगाने दूर केल्या आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे. एकूणच यामुळे मतदार याद्यांचा कार्यक्रम लांबत आहे. त्यामुळे आयोगाने प्रारूप मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या गुरूवारी प्रसिध्द होणार आहेत.

या मतदार याद्यांवर दि. 7 ते 18 जूनअखेर मतदारांना हरकती सूचना दाखल करता येणार येणार आहे. हरकती व सूचनांचा विचार घेवून अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या दुरूस्तीसह दि. 29 जूनला प्रसिध्द केल्या जाणार आहेत. मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार याद्या दि. 2 जुलैला प्रसिध्द होणार आहेत. त्यानुसार मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम पूर्ण झाले आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या गुरूवारी महापालिकेत व महापालिकेच्या निवडणूक वेबसाईडवर प्रसिध्द होईल.