Sat, May 25, 2019 23:04होमपेज › Sangli › धोकादायक शाळा खोल्यांकडे शिक्षणमंत्र्यांचे वेधले लक्ष

धोकादायक शाळा खोल्यांकडे शिक्षणमंत्र्यांचे वेधले लक्ष

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 10:04PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदांच्या जुन्या, जीर्ण, धोकादायक झालेल्या शाळा खोल्या बांधकामाच्या निधीसंदर्भात ग्रामविकास मंत्री व मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे, असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तमनगौडा रवि-पाटील यांनी दिली. राज्यातील जिल्हा परिषदांकडील शिक्षण सभापतींच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री तावडे, ग्रामविकासचे सचिव असिम गुप्ता यांची नागपूर येथे भेट घेतली. यावेळी आमदार विलासराव जगताप उपस्थित होते. शिष्टमंडळात पुणे जिल्हा परिषदेचेे उपाध्यक्ष, शिक्षण सभापती विवेक वळसे-पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तमनगौडा रवि-पाटील, सोलापूरचे शिक्षण सभापती शिवानंद पाटील यांचा समावेश होता.

राज्यात जिल्हा परिषद शाळांकडे शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत; ती तातडीने भरावीत, शिक्षक बदल्यांमधील त्रुटी दुरुस्त करावी व अन्य मागण्यांकडे शिक्षणमंत्री तावडे यांचे लक्ष वेधले. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 400 शाळा खोल्या धोकादायक आहेत. पावसाळा सुरू आहे. पावसामुळे काही ठिकाणी जीर्ण, धोकादायक शाळा खोल्या पडल्या आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची असून शाळा खोल्यांची दुरस्ती, नवीन बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या छोट्या गटाने 17 कोटी रुपये तरतूद मान्य केली होती. मात्र प्रत्यक्षात जिल्हा नियोजन समितीने 2.53 कोटींची तरतूद केली आहे. 

त्यामुळे आता शासनस्तरावरून खास बाब म्हणून निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी रवि-पाटील यांनी तावडे यांच्याकडे केली. दरम्यान जिल्हा परिषद स्वीय निधीतून निधी उभारण्यासंदर्भात तावडे यांनी सूचविले. मात्र स्वीय निधीस मर्यादा असल्याचे रवि-पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्हा परिषदेच्या शाळांकडील उपशिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापकांची 718 पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदली झालेल्या 208 शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास रिक्त पदांची संख्या 926 पर्यंत जाते. त्यामुळे शिक्षक भरती तातडीने करा,  अशी मागणीही  पाटील यांनी केली.