होमपेज › Sangli › राजकीय नाट्याचा आज पहिला अंक!

राजकीय नाट्याचा आज पहिला अंक!

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 8:21PMसांगली : सुनील कदम

अनेक अर्थाने ‘नाट्यपंढरी’ असलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा बुधवारी (दि. 11) शेवटचा दिवस असून त्याचदिवशी खर्‍या अर्थाने या निवडणूक नाट्याची पहिली घंटा वाजून पहिल्या अंकाला सुरूवात होणार आहे. या निवडणूक नाट्यात सहभागी होणारे बहुसंख्य सगळे ‘अभिनेते’ प्रयोगासाठी  तयार आहेत, पण अनेकांना आपण नेमकी कोणती ‘भूमिका’ वठवायची आहे, कोणती भूमिका आपल्या वाट्याला येणार आहे, याचा थांगपत्ताच नाही. महापालिकेच्या या निवडणूक नाट्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीनही प्रमुख राजकीय पक्षांंची अंतिम उमेदवार यादी अजून जाहीर केलेली नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीत आघाडीचा आणि जागावाटपाचा तिढा अजून तरी सुटलेला नाही. त्यामुळे ही आघाडी होणार की नाही, झाली तर आघाडी धर्मानुसार द्यावयाच्या आणाभाका हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते निभावणार का, याची कोणतीही शाश्‍वती देता येत नाही. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार आणि दोन्ही पक्षातील कोण कोण बंडाचा झेंडा फडकविणार, याचा अंदाज करणे कठीण होऊन बसले आहे. 

दुसरीकडे या दोन्ही पक्षातील बंडखोरीवरच ज्यांच्या उमेदवार निश्‍चितीची कमान अवलंबून आहे, त्या भाजपनेसुध्दा आपली अंतिम उमेदवार यादी निश्‍चित करण्यास चालढकल चालविलेली आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर किंवा फिसकटल्यानंतर या दोन्ही पक्षांतून फुटून भाजपमध्ये डेरेदाखल होणार्‍या आयारामांवर भाजपची अंतिम यादी अवलंबून आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेल्या शिवसेना आणि शहर सुधार समितीचा उमेदवारांचा कोटा अद्याप तरी पूर्ण झालेला दिसत नाही.  अन्य काही पक्षांनाही ऐनवेळी येऊन मिळणार्‍या काही आयारामांची प्रतीक्षा असल्याचे दिसत आहे. बाकी काही हवशे, नवशे, काही अपक्ष मंडळी आपापल्या पातळीवर तयारीला लागलेली दिसत आहेत.

आज  निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने  पहिली घंटा वाजून या नाट्याच्या पहिल्या अंकाला सुरूवात होणार आहे. या निवडणूक नाट्याचे वैशिष्ठ्य म्हणजे एकाला दोन म्हणता चार-चार, पाच-पाच ‘रंगमंच’ तयार आहेत, प्रत्येक रंगमंचावरील कथा-पटकथा, संवाद, संगीत सामग्री सगळी तयार आहे, बहुसंख्य अभिनेतेेसुध्दा प्रयोगासाठी तयार आहेत, पण अनेक अभिनेत्यांचा नेमका ‘रंगमंच’ अजूनही निश्‍चित झालेला नाही, अनेकांची तर अजून नेमकी ‘भूमिका’सुध्दा निश्‍चित झालेली नाही.‘सूत्रधार’ मंडळी आपापल्या नाटकाचा पडदा उघडून दुसर्‍याच्या नाटकावर पडदा टाकण्याच्या घाईगडबडीत दिसत आहे. एकूणच महापालिका निवडणुकीच्या रंगमंचावर आता नुसता हलकल्लोळ माजायला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बहुतेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या आणि नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा न करता उमेदवारी अर्ज भरून टाकल्याचे दिसत आहे. काहीजण मात्र अजूनही नेत्यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. आपापल्या पक्षाचा, नेत्यांचा आणि आपल्या उमेदवारीबाबतचा कोणताच थांगपत्ता लागत नसल्याने या दोन्ही पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांनी ऐनवेळी पर्याय म्हणून एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज भरण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे, जणेकरून ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारली तर पर्याय उपलब्ध असावा. इच्छुक उमेदवारांनी अंगिकारलेले हे धोरण विचारात घेवून 

अभिनय नको, कर्तृत्व पारखा!

जवळपास पंधरा-वीस दिवस रंगणार्‍या या महानाट्यात मतदारराजाला सगळ्याच राजकीय रंगमंचावरील ‘खेळ’ बघायला मिळणार आहेत. अनेकांच्या  हुबेहुब नकला आणि बेमालूम अभिनय बघायला मिळणार आहे. कारण या महानाट्यात उतरलेले अनेकजण कसलेले अभिनेते आहेत,  त्यामुळे ते अशा काही अभिनयाचे दर्शन घडवतील की वाह रे वाह! पण नेहमीप्रमाणे त्यांच्या दिलखेचक संवादाला भुलायचे, अभिनयाला दाद द्यायची की त्यांच्यातील खर्‍याखुर्‍या ‘कर्तृत्वाची’ पारख करायची, याचा सर्वस्वी निर्णय शेवटी मतदारराजालाच घ्यावा लागणार आहे!