Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Sangli › फाईल अडवाअडवीवरून अभियंत्याला शिवीगाळ

फाईल अडवाअडवीवरून अभियंत्याला शिवीगाळ

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

निवडणुकीच्या तोंडावर विविध कामांच्या फायली अडविल्यामुळे संतप्त  झालेले  नगरसेवक महेंद्र सावंत यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत अभियंत्याला शिवीगाळ केली. त्यामुळे उपायुक्‍त स्मृती पाटील यांच्यासह अधिकार्‍यांनी सभेवर बहिष्कार घालत सभात्याग केला.  सदस्यांनीही प्रशासनाचा निषेध करीत सभापतींच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी अधिकार्‍यांची समजूत काढली. त्यांना सभेत बोलावले. अधिकार्‍यांनी या प्रकाराचा निषेध केला. निवेदन दिले. नंतर  सभा पार पाडली. 

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहिता लवकरच जाहीर होणार असल्याने उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे; परंतु अधिकार्‍यांकडूनजाणीवपूर्वक अडवणूक, प्रसंगी फाईल गायब करण्याचे प्रकार होतात अशी त्यांची तक्रार आहे. त्यामुळे सदस्य-अधिकार्‍यांत वाद सुरू आहे. यासंदर्भात गेल्या तीन-चार सभांमध्ये खडाजंगी, वादावादी झाली होती.आज महेंद्र सांवत यांनी लतिफ पठाण कॉलनीतील रस्ता कामाच्या फाईलीबाबत अभियंता डी.डी.पवार यांना विचारणा केली. परंतु ही  फाईल  तुमच्याकडेच दिली असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले.मागील सभेत याच फाईल गहाळ प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सभापती सातपुते यांनी फाईल गहाळ झाली असेल तर फौजदारी दाखल करा असे आदेश दिले होते. असे असताना  फाईल ‘माझ्याकडे दिल्याचे पवार खोटे सांगत आहेत’असा आरोप सावंत यांनी केला.

यावरुन सावंत आणि पवार यांच्यात  सभागृहात वादावादी सुरू झाली. संतापाच्या भरात सावंत यांनी शिवीगाळ केली. सभागृहात या प्रकारामुळे अधिकारी आणि सदस्यही अवाक् झाले. अधिकार्‍यांनी थेट सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वच अधिकार्‍यांनी सभागृह सोडले. उपायुक्‍त कार्यालयात जमून सर्वच अधिकार्‍यांनी या प्रकाराचा निषेध केला. सभापती सातपुते यांना निवेदन द्यायचे ठरले. तोपर्यत दिलीप पाटील, सातपुते यांच्यासह अनेक सदस्यांनी अधिकार्‍यांशी मोबाईलवरून संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे अधिकारी पुन्हा सभागृहात आले.  

उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य लेखा परीक्षक संजय गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ.संजय कवठेकर, डॉ.सुनिल आंबोळे, विद्युत अभियंता अमर चव्हाण, सिस्टिम मॅनेजर नकुल जकाते,कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांच्यासह सर्वच अधिकार्‍यांनी  सातपुते यांना निवेदन दिले. महिला सदस्य, अधिकार्‍यांसमोर अशी गैरवर्तणूक करणार्‍या सदस्यांना समज द्यावी.  त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई  करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर वादावर पडदा पडला.

दिलीप पाटील यांचे आंदोलन

यानंतर दिलीप पाटील यांनी दरमान्यतेच्या फाईल पेंडिग कशासाठी ठेवल्या, असा सवाल केला. अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे  पाटील यांनी सभापतींच्या आसनासमोर ठाण मांडले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मृणाल पाटील यांच्यासह  सर्वच सदस्य या आंदोलनात सहभागी झाले. अखेर सातपुते यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करुन येत्या आठवड्यात या फाईल मंजूर होतील असे स्पष्ट केले.

घनकचरा प्रकल्पाचा मुहूर्त कधी?

स्वाभिमानीचे सदस्य शिवराज बोळाज यांनी घनकचरा प्रकल्पाच्या रखडलेल्या प्रक्रियेबद्दल आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ यासाठी 42 कोटी रुपये महापालिकेने निधी बाजूला ठेवला आहे; परंतु ते पैसे पडून आहेत. घंटागाड्या, साहित्यांची वानवा आहे. कचरा डेपोंचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. याला कोणी वाली आहे की नाही? कचरा वर्गीकरण, प्रक्रिया होणार नसेल तर हे पैसे कशासाठी ठेवलेत? यावर प्रशासन आणि सभापतींनीही उत्तर देणे टाळले.