Thu, Jul 18, 2019 12:59होमपेज › Sangli › मिरजेतील बनावट नोटा सातारच्या रॅकेटमधीलच

मिरजेतील बनावट नोटा सातारच्या रॅकेटमधीलच

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:39PMमिरज : शहर प्रतिनिधी

बनावट नोटाप्रकरणी मिरज पोलिसांनी पकडलेले गौस मोमीन (रा. मिरज) व शुभम खामकर (रा. सातारा) हे दोघे सातारा पोलिसांनी पकडलेल्या बनावट नोटा रॅकेटमधीलच आहेत. त्यांच्याकडूनच त्यांनी बनावट नोटा घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी दोघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.मोमीन याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्याच्याजवळ पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या. त्या नोटा खपविण्यासाठी खामकर याने गौस याला दिल्या होत्या, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. गौस याला तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सातारा येथे छापा टाकून खामकरला ताब्यात घेतले होते. त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली

यापूर्वी गौस याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे गौस व खामकर या दोघांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपली. त्यामुळे त्यांना आज मिरज न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले. दोघांच्याही पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी त्या दोघांचीही   कसून चौकशी केली. ते दोघेही सातारा पोलिसांनी पकडलेल्या रॅकेटमधीलच आहेत. त्या रॅकेटकडूनच त्यांनी त्या बनावट नोटा घेतल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी अटक केलेल्या सर्व संशयितांना मिरज पोलिस ताब्यात घेणार आहेत.