होमपेज › Sangli › जिल्हा बँक संचालकांत ‘वसंतदादा’च्या करारावरून वाद

जिल्हा बँक संचालकांत ‘वसंतदादा’च्या करारावरून वाद

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:46PMसांगली : प्रतिनिधी

वसंतदादा सहकारी साखर कारखाना श्री दत्त इंडियाला दहा वर्षे भाडेत्तत्त्वावर चालविण्यास देण्याच्या करारातील त्रुटींवरून  सोमवारी जिल्हा बँक संचालक मंडळ सभेत जोरदार वाद झाला. बँकेकडे जमा अनामत रकमेतून कारखान्याला शेतकरी व कामगारांच्या देण्यांसाठी दिलेले 30 कोटी रुपये वादग्रस्त ठरले आहेत. बँकेच्या चार्टर्ड अकौंटंटनी करारातील काही त्रुटीही सभेपुढे मांडल्या. कराराच्या अनुषंगाने ‘बँकेचे संचालक मंडळ - दत्त इंडिया व चार्टर्ड अकौंटंट’ यांची लवकरच स्वतंत्र बैठक होणार आहे. 

जिल्हा बँकेत सोमवारी संचालक मंडळ सभा झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. संचालक विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक,  बी. के. पाटील, सी. बी. पाटील,  सिकंदर जमादार, उदयसिंह देशमुख, सुरेश पाटील, महेंद्र लाड, विक्रम सावंत, डॉ. प्रताप पाटील, गणपती सगरे, बाळासाहेब होनमोरे, कमलताई पाटील, श्रद्धा चरापले, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील उपस्थित होते. वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या करारासंदर्भात चर्चा हा एकमेत्त विषय विषयपत्रिकेवर होता. 

वसंतदादा कारखाना 10 वर्षे भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार जिल्हा बँक-दत्त इंडिया व वसंतदादा कारखाना व्यवस्थापन असा त्रिपक्षीय झाला आहे. सर्वाधिक 261 रुपये प्रतीटन गाळप भाड्याची निविदा श्रीदत्त इंडिया (मुंबई) यांनी भरली होती. कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यापोटी दत्त इंडियाने 60 कोटी रुपये बिनव्याजी सुरक्षा डिपॉझिट म्हणून जिल्हा बँकेत प्राधिकृत अधिकारी तथा बँकेचे सरव्यवस्थापक  यांचे करंट खाती जमा करायची असे करारात नमूद आहे. 

दत्त इंडियाने जिल्हा बँकेत जमा केलेले 60 कोटी रुपये हे सुरक्षा अनामत आहे. कराराची मुदत संपल्यानंतर ही रक्कम दत्त इंडियाला परत करायची आहे. मात्र जिल्हा बँकेने या 60 कोटी रुपयांमधील 30 कोटी रुपये वसंतदादा कारखान्याला शेतकरी व कामगारांच्या देण्यासाठी कसे दिले, त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न विक्रम सावंत यांनी सोमवारी संचालक मंडळ सभेत उपस्थित केला. व्याजापोटी बँकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. संचालक मंडळ सभेत चार्टर्ड अकौंटंट यांनी करारातील त्रुटी मांडल्याचे विक्रम सावंत यांनी सांगितले.  

सुरक्षा अनामत रकमेतील 30 कोटी रुपयांचा मुद्दा सावंत यांनी उपस्थित केल्यावर संचालक डॉ. प्रताप पाटील यांनी हरकत घेतली. सावंत व डॉ. पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. वसंतदादा कारखान्याकडे बँकेचे 85 कोटी रुपये थकित आहेत. दत्त इंडियाने आत्तापर्यंत 63 कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. वार्षिक भाडे 13 कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे कारखान्याला दिलेल्या 30 कोटींचा मुद्दा विशेष गंभीर नाही, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. मात्र सावंत यांनी चार्टर्ड अकौंटंटनी उपस्थित केलेल्या करारातील त्रुटी व कराराचा भंग करून कारखान्याला दिलेले 30 कोटी रुपये हा मुद्दा जोरदारपणे लावून धरला. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या करारास वर्ष होऊन गेल्यानंतर आत्ताच त्रुटी कशा दिसल्या, असा सवाल काही संचालकांनी उपस्थित केला.  दरम्यान वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार व चार्टर्ड अकौंटंट यांनी उपस्थित केलेले मुद्दे यावर चर्चा करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची चार दिवसात पुन्हा बैठक बोलविण्याचा निर्णय झाला.