होमपेज › Sangli › पिके जळाल्यानंतर पाणी देऊन उपयोग काय? 

पिके जळाल्यानंतर पाणी देऊन उपयोग काय? 

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

पाण्याविना पिके जळू लागली आहेत. आता आमचा अंत पाहू नका. म्हैसाळ पाणी योजना तातडीने सुरू करा. पिके जळाल्यानंतर  पाणी देऊन उपयोग काय, असा सवाल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत नेत्यांनी अधिकार्‍यांना केला. 

दरम्यान, बैठकीत पाटबंधारे अधिकार्‍यांनी किमान पंधरा कोटी रुपये भरा. त्यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. मात्र बैठकीतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. म्हैसाळ पाणी योजना सुरू करा, या मागणीसाठी शेतकर्‍यांमध्ये असंतोष वाढत आहे. आंदोलने होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे- म्हैसाळकर, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद इनामदार, राष्ट्रवादीचे हणमंतराव देसाई ,बाळासाहेब होननमोरे, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता हनमंत गुणाले, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे, नामदेव करे आदि उपस्थित होते. 

बैठकीच्या सुरुवातीलाच सर्वांनी  आम्हाला शाश्वत पाणी हवे आहे. निवडणूक आली की पाणी सोडले, नंतर बंद केले असे चालणार नाही असे म्हणणे मांडले. पाणी देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. शेतकरी पैसे भरण्यास तयार आहेत. मात्र त्यासाठी यंत्रणा सक्षम नाही. वर्षातून पाच वेळा पाणी मिळेल, याची खात्री आहे का? सरकारने वीज बिल सवलतीसाठी 81-19 चा अध्यादेश काढला आहे का आदि सवाल नेत्यांनी विचारले.

अधिकार्‍यांनी म्हणणे मांडले ते असे : म्हैसाळचे 68 कोटी रुपये थकित आहेत. त्यापैकी 30 कोटी रुपये वीज बिलाचे आहेत. त्यापैकी किमान 15 कोटी रुपये भरल्याशिवाय पाणी योजना सुरू होणार नाही. त्यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा. टेंभू, ताकारी या पाणी योजनांचे वीज बिल भरण्यासाठी त्या परिसरातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. त्या प्रमाणे मिरज पश्‍चिम भागात असलेल्या साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा. 

एका आवर्तनासाठी किमान सव्वादोन कोटी भरणे गरजेचे आहे. कारखान्यांनी पुढाकार घेऊन दहा कोटी रुपये भरल्यास  पाच कोटी रुपये इतर पिकातून आम्ही वसूल करू. उसाला एकरी चार हजार रुपये घ्यायला हवेत. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,  पाणी योजना सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून पैसे मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यात शेतकर्‍यांनीही योगदान देणे गरजेचे आहे. वसुली प्रक्रियेत कारखान्यांनीही सहभाग घ्यायला हवा. पाणी आल्यानंतर पिकांचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न सुटणार आहे

. Tags : sangli, sangli news, crops burning, water, look, our end