Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Sangli › मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भेटवस्तू वाटा

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भेटवस्तू वाटा

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 11:08PMसांगली : प्रतिनिधी

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरटी भेटवस्तू वाटा. चार महिन्यात तीन-चारवेळा पोहोचा. मोबाईल क्रमांक मिळवा. त्यांच्या आजारपणापासून सर्वच गरजांची पूर्तता करून मतदार घट्ट करा, असा अनोखा कानमंत्र महसूलमंत्री चद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. निमित्त होते येथील भावे नाट्यगृहात भाजप बूथ कमिट्या पदाधिकार्‍यांच्या प्रशिक्षण शिबिराचे. महापालिका क्षेत्रात 450 बूथप्रमुखांंना यासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट दिले. कोल्हापूर निवडणुकीतही असाच फॉर्म्युला अवलंबल्याचे  त्यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांना भेटवस्तू पोहोचविण्याची जबाबदारीच घेतली नाही तर त्या पोहोचही केल्या.

पाटील म्हणाले, सत्तेत असूनही अशा प्रकारे बूथनिहाय निवडणुकीची तयारी करणारा आणि जनतेपर्यंत पोहोचण्याची काळजी घेणारा एकमेव पक्ष आहे. पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत प्रत्येकाने त्यांच्या मतदारसंघात बूथची जबाबदारी घेतली आहे. देशभरात सरपंच, सदस्यांपासून आमदार, खासदारांसह सर्वचजण विविध पदांवर असणारे 41 हजारांवर सदस्य आहेत. अशांसह सर्वजणांवर बूथचीची जबाबदारी आहे. 

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत 450 बूथ आहेत. त्यांची बांधणी मजबूत झाली आहे. प्रत्येक बूथच्या अध्यक्षांसह प्रमुखांनी किमान 200 घरांपर्यंत पोहोचायचे आहे. प्रत्येक घरात एक भेटवस्तू द्या. यासाठी 1 लाख भेटवस्तू मी तुम्हाला पहिल्या टप्प्यात देतो. पुढेही देत राहू. यातून आजारपण, कोणाचे नित्य औषध, आजाराच्या तपासण्या असतील तर त्याही करा. त्यासाठीही मदत करू. अर्थात हे करताना जपून व सबुरीने करा, असे ते म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.

पाटील म्हणाले, प्रत्येक घरात चार-पाचवेळा गेला, की बांधिलकी निर्माण होईल. प्रत्येक घरात चार ते पाच मतदार असतात. अशा पद्धतीने किमान त्यातील बूथवार 350 ते 400 मतदान नक्की होईल. तेवढ्या मतांवर महापालिका निवडणूक जिंकलीच म्हणून समजा. लोकसभा, विधानसभाही त्याच पद्धतीने जिंकू. प्रत्येक बूथने पहिल्या टप्प्यात यासाठी  22 तारखेपर्यंत प्रत्येकी किमान 200 घरांपर्यंत पोहोचलेच पाहिजे.

दर आठवड्याला मी येणार
ते म्हणाले, महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. त्यानुसार आता बूथवार प्रगतीचा आढावा घेणार आहे. माझ्यावरही एखाद्या बूथमध्ये जबाबदारी द्या. त्यासाठी मीही उतरेन.

मनपा निवडणूक आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली
मेळाव्याच्या समारोपानंतर अचानक ना.पाटील यांनी पुन्हा  ध्वनिक्षेपकाचा  ताबा घेतला. ते म्हणाले, महापालिका निवडणूक ही शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. सर्वांनीच महापालिका निवडणुकीसाठी ताकद लावायची आहे. पण प्रत्येक निवडणुकीला कोणाचे ना कोणाचे  तरी नेतृत्व आवश्यक असते. त्यानुसार गाडगीळच नेते असतील. त्यांना माजी आमदार दिनकर पाटील व शेखर इनामदार हे सहाय्य करतील. दरम्यान या मेळाव्यास खासदार संजय पाटील व आमदार सुरेश खाडे अनुपस्थित होते.