Sun, Aug 25, 2019 04:18होमपेज › Sangli › जिगरबाज खरशिंगच्या माळावर विषमुक्त द्राक्ष, धान्याची शेती

जिगरबाज खरशिंगच्या माळावर विषमुक्त द्राक्ष, धान्याची शेती

Published On: Apr 08 2018 2:16AM | Last Updated: Apr 07 2018 7:54PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

दुष्काळाचा शाप भोगत वाटचाल करत असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंगच्या माळावर प्रयोगशील आणि नाविण्याचा ध्यास घेतलेल्या जिगरबाज तरुण शेतकर्‍यांनी नैसर्गिक ‘झिरो बजेट’ शेती करताना  विषमुक्त अन्नधान्य उत्पादनाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. 

नैसर्गिक शेती अर्थात ‘झिरो बजेट’ शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या संकल्पनेतून देशात नैसर्गिक शेतीची संकल्पना विकसित होत आहे. या झिरो बजेट नैसर्गिक शेतीमधील अन्नधान्य उत्पादनांनी पुणे, मुंबईपासून ते खाली मद्रास, कोईमतूरपर्यंत लौकिक मिळविला आहे. खरशिंग येथील दिग्विजय शिंदे, दत्ताजीराव कोरे, डॉ. दिलीप कुलकर्णी, अधिकराव हिरगुडे, राजाराम हिरगुडे, केशव कोरे, विठ्ठल शिंदे या प्रयोगशील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन श्री समर्थ झिरो बजेट नैसर्गिक शेती ग्रुपची स्थापना केली आहे. मिरज - पंढरपूर मार्गावर दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी खरशिंग वसले आहे. नैसर्गिक शेतीची शिबिरांमध्ये माहिती घेऊन या गटाने नैसर्गिक शेतीस सुरुवात केली.

दिग्विजय शिंदे  म्हणाले, शेतीत रासायनिक खतांसाठी एकरी किमान एक लाखाचा खर्च येत होता. तसेच उत्पन्‍नांसाठी भाव कमी मिळत होता. यातूनच नैसर्गिक शेतीचा पर्याय दिलासा देतो आहे. यासाठी बुरशीनाशक म्हणून जीवामृत, आंबट ताक, शेवगा, पपईच्या पानाचा अर्क आदींचा वापर करतो. संजीवके म्हणून 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम ज्येष्ठमध, तीळ, गोमूत्र आदीं फवारणीसाठी वापरले. द्राक्षमण्याची चांगली फुगवण होते, चकाकी वाढते. कीटकनाशके, औषधे, रासायनिक खते न वापरलेली द्राक्षे दिल्ली, आंध्र, केरळ, कोईमतूर, हैदराबाद, गुजरात, बडोदा, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड या भागात विकली जाऊ लागली.  याच  द्राक्षबागेत विविध कडधान्ये, भाजीपाला घेतला जातो, त्यांना बाजारात ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. सातही शेतकर्‍यांकडे प्रत्येकी दोन- दोन खिलार गायी आहेत. त्यांचे गोमय, गोमूत्र शेतीसाठी वापरले जाते. 

Tags : Sangli, concept,  non poisonous, food, grain, production, actually, true.