Mon, Jun 24, 2019 16:53होमपेज › Sangli › शहरातील कचराकुं ड्या ‘ओव्हर फ्लो ’

शहरातील कचराकुं ड्या ‘ओव्हर फ्लो ’

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 8:04PMइस्लामपूर : शहर वार्ताहर    

इस्लामपूर पालिकेला स्वच्छता अभियानामध्ये देशात 17 वा, तर  राज्यात 8 वा क्रमांक मिळाला. त्यानंतर मात्र काही दिवसातच शहरात स्वच्छता मोहीम थंडावली आहे. कचरा कुंड्या उलटून गेल्या तरी तेथील कचरा उचलला जात नाही.पालिकेला नुकतेच केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण  अभियानात 5 कोटींचे बक्षीस मिळाले. शहरात साखर वाटून सत्ताधार्‍यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, आठवड्यातच शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. 

बसस्थानक रोडनजीक कचराकुंड्या उलटून गेल्या आहेत. तेथील कचरा गटारीत पडत आहे. यामुळे गटारी तुंबल्या आहेत.  जैनस्तंभ परिसरातील कचरा कुंड्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने कचरा उघड्यावर पडला आहे. त्या ठिकाणी गाढवांचा वावर वाढला आहे. नूतन तहसील इमारतीनजीक उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्याठिकाणी कचर्‍याचा खच कायम असतो. भाजी मंडईतील कचरा उचलला जात नाही. यामुळे रात्रीच्या सुमारास गाढवांचा कळप मुक्‍तपणे बाजार कट्यांवर फिरत असतो. कळप तेथे पडलेल्या भाजीपाल्यावर ताव मारीत असतो. शिराळा नाका, उर्दू शाळेसमोरील क्‍लब हाऊस परिसर, कापूसखेड नाका परिसर आदी ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मटण मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. तेथील इमारतीची पडझड झाली असून याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असून परिसरात मच्छीमार दाटीवाटीने बसलेले असतात. या परिसरात रात्रीच्यावेळी कुत्र्यांच्या झुंडी फिरत असतात.स्वच्छता अभियानातील मिळालेल्या यशानंतर पालिकेने स्वच्छतेत सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

स्वच्छतागृहांची दुरवस्था...

शहरात स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. फायबरची स्वच्छतागृहे फुटली आहेत. स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.