Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Sangli › शहराचा मध्यवर्ती भाग उपेक्षितच

शहराचा मध्यवर्ती भाग उपेक्षितच

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 7:50PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज, कुपवाड  महापालिका  क्षेत्राचा मध्यवर्ती आणि शहराच्यादृष्टीने महत्वाचा असलेला हा भाग विविध सुविधांपासून उपेक्षितच आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, मध्यवर्ती प्रशासकीय या भव्य इमारती असल्या तरी या भागाचा फारसा विकास काही झालाच नाही. अंतर्गत भागात खराब रस्त, ड्रेनेज, गटारी, पिण्याचे पाणी आदी समस्या गंभीर आहेत.  सांगली, मिरज आणि कुपवाडच्या मध्यवर्ती असलेल्या या प्रभागामध्ये अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण  गटातून दोन अशी चार आरक्षणे आहेत. 

विजयनगर चौकात दिवसें-दिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी झाली. मात्र त्या ठिकाणी भूमिगत रस्ता करण्याबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झाला नाही. विजयनगर चौकातून हसनी आश्रमकडे जाणारा रस्ता कागदावर 80 फुटी आहे. प्रत्यक्षात  मात्र तो 40 फुटीसुद्धा नाही. या रस्त्यावरच न्यायालयाची इमारत आहे. दोन्ही बाजूंनी अतिक्रमण आहे. गर्व्हमेंट कॉलनी परिसर शहरातील मुख्य आहे, मात्र या भागाचा फारसा विकास झाला नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

या भागात मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आहेत. तरी एकही चांगले उद्यान नाही. वॉन्लेसवाडी परिसरात विविध सुविधांची वानवा आहे. पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही. घंटागाडी फिरकत नाही. औषध  फवारणी नसल्याने डासांचे प्रमाण त्रस्त करणारे आहे. या ठिकाणी गटारी नाहीत. पावसाळ्यात लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. शासकीय कार्यालय या भागात झाल्याने या परिसराचा विस्तार झपाट्याने होत आहे. तुलनेत सुविधांचा अभाव आहे. सहयोगनगर, नाना पाटील नगर, विधाता कॉलनी,  सेंट्रल  वेअर हाऊस या भागातील  नागरिकही विविध समस्यांनी त्रस्त आहेत. पाणीपुरवठा कमी दाबाने   होत आहे. घंटागाडी वेळेवर येत नाही. अंतर्गत रस्ते खराब आहेत. त्यामुळे येथील नागरिकांत नाराजी आहे. 

समस्या प्रभागाच्या 19

लोकसंख्या : 24 हजार 724

परिसर : एस.टी. कॉलनी, खरे क्‍लब, गर्व्हमेंट कॉलनी, हसनी आश्रम, नागराज कॉलनी, वॉन्लेसवाडी, स्वप्ननगरी, सहयोगनगर, नाना पाटीलनगर,  विधाता कॉलनी, सेंट्रल वेअर हाऊस