Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Sangli › चांदोली धरणातून विसर्ग वाढविला

चांदोली धरणातून विसर्ग वाढविला

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 11:52PMसांगली/ पाटण : प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात आज सर्वत्र जोरदार पाऊस पडला. धरण परिसरात तुफानी पाऊस सुरू असल्याने कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. चांदोली धरणातून 11 हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. कोयना धरणातून गुरुवारी पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, कोयना धरणांतर्गत विभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात 72  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात 5.69 टीएमसीने तर पाणी उंचीत 6.3 फुटाने वाढ झाली आहे. 

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. आज सकाळपासून मात्र दमदार पावसाला सुरुवात झाली.  शिराळा तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. रविवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत  107 मिलीमीटर पाऊस पडला. मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.चांदोली धरणात 29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.  धरणातून  11 हजार  क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. आरळा -शितूर व चरण-सोंडोली पूल,  कोकरुड - रेठरे  बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. 

कानसा नदीचे पाणी  मालेवाडी जवळच्या पुलावरून पाणी वाहत आहे. तेथील वाहतूक बंद झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर  विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.वाळवा, पलूस, कडेगाव,  मिरज, सांगली, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली. कराड परिसर व जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढते आहे.  सांगली पाणी पातळी 18 फुटांपर्यंत गेली आहे.

आज सकाळपर्यंत (गेल्या 24 तासात)  कोयना  192, नवजा  277 व महाबळेश्‍वरमध्ये 189 मिलीमीटर असा उच्चांकी पाऊस झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात   12 जूनपासून सलग  अतिवृष्टी सुरू आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसाचे प्रमाण  असेच राहिल्यास   बुधवारपासून  सुमारे  2100 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. तसेच  गुरुवारपासून सांडव्यावरुनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.