Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Sangli › भाजप सरकार उलथून टाका: अजित पवार

भाजप सरकार उलथून टाका: अजित पवार

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 11:45PMकुंडल :  वार्ताहर

केंद्र व राज्यसरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. या सरकारने  सर्वसामान्यांची घोर निराशा केली आहे. फसव्या आश्वासनांच्या आधारावर सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यसरकार आगामी निवडणुकीत  उलथून टाका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी  केले.

कुंडल (ता.पलूस) येथे आयोजित सभेत ते  बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुणअण्णा लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते.पवार  म्हणाले, भाजप-शिवसेना सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. हे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून बेरोजगारी, महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे.
 

धनंजय मुंडे म्हणाले, हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला सत्तेतून खाली खेचल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर्वसामान्यांना भूलथापा देऊन तसेच गुजरात मॉडेल समोर ठेवून हे सरकार सत्तेमध्ये आले आहे. हे सरकार फक्त आश्वासनांची खैरात करीत आहे. मोदींनी सुशिक्षित  व बेरोजगार तरुणांची  चेष्टा करण्याचे काम केले आहे.   येळावी फाटा येथे हल्लाबोल यात्रेचे अरुणअण्णा लाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.   येळावी फाटा ते क्रांती कारखाना कार्यस्थळापर्यंत   दोन हजार मोटारसायकल भाजप-शिवसेना सरकार विरोधात घोषणा देत सहभागी झाल्या  होत्या.  या हल्लाबोल यात्रेचे येथील क्रांती कारखाना कार्यस्थळावर सभेत रुपांतर झाले.
प्रमोद हिंदुराव, महेश तपासे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, छायाताई पाटील, मारुती चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags :