Sat, Apr 20, 2019 16:19होमपेज › Sangli › इस्लामपूरकरांच्या मानगुटीवर करांचे ओझे

इस्लामपूरकरांच्या मानगुटीवर करांचे ओझे

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 10:25PMइस्लामपूर : सुनील माने

इस्लामपूर नगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांवर सतत विविध करांचा बोजा लादत आहे, अशी तक्रार आहे. मालमत्ताधारकांचा प्रश्‍न विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. तरीही प्रशासन 100 टक्के कर भरण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविरोधात आंदोलनाची तयारी सुरू आहे.  

सुमारे 1500 हून अधिक मालमत्ताधारकांचा प्रश्‍न अजून पुणे आयुक्तांसमोर प्रलंबित आहे. तोपर्यंत पालिका प्रशासनाने नव्याने सुमारे 1200 हून अधिक मालमत्ताधारकांच्या मानगुटीवर कराचे ओझे ठेवले आहे. अपील  नुसते नावालाच, कागदोपत्री घोडे नाचवून फक्त नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे, दिशाभूल करणे असा प्रकार प्रशासनाकडून होत असल्याची तक्रार आहे. 

यावर्षीच्या   नवीन   कराच्या पावत्या मालमत्ताधारकांना दुसर्‍यांदा मिळाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात  नोटीसवजा कराच्या पावत्या आल्या होत्या. त्यावर नागरिकांनी कर मान्य नसल्याच्या लेखी तक्रारी पालिकेकडे दिल्या आहेत. यावर सुनावणी सुरू आहे. मात्र सुनावणीचा निर्णय न देता पुन्हा त्याच रकमेची पक्की बिले घरोघरी पाठवून दिली आहेत. यामुळे  कराच्या वादाचा विषय गंभीर बनू लागला  आहे. 

नगरसेवक शकील सय्यद यांनी शेकडो मालमत्ताधारकांना बरोबर घेऊन कर पावत्यांची होळी केली होती. सय्यद म्हणाले, पालिका अ‍ॅक्टनुसार पक्की बिले प्राप्‍त झाल्यापासून 30 दिवसांच्या मुदतीत मालमत्ताधारकांनी त्यापैकी  50 टक्के रक्कम रोख भरून 1995 च्या अ‍ॅक्टनुसार अपील अर्ज करायची तरतूद आहे. परंतु प्रशासनाने मात्र  100 टक्के रक्कम भरल्याशिवाय आम्ही अपील अर्ज स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ती योग्य नाही. हा  नागरिकांवर अन्याय आहे. नागरिकांनी 30 दिवसांच्या आत आलेल्या संकलित कराची 50 टक्के  रक्कम भरूनच अपील करावे आणि पोहोच घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.