Sat, Mar 28, 2020 20:37होमपेज › Sangli › प्रशासनाचे बजेट ६७५ कोटींचे

प्रशासनाचे बजेट ६७५ कोटींचे

Last Updated: Feb 18 2020 11:49PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेचे 2020-21 चे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडनीस यांनी अंतिम केले आहे. 675 कोटींवर ते पोहोचले आहे. पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या सभेत ते सादर करणार आहेत. या अंदाजपत्रकामध्ये भरघोस उत्पन्नवाढ आणि त्याचबरोबर विकासाच्या अनेक योजनांचा  समावेश आहे.

महापुरामुळे शहराचे मोठे नुकसान झाले. त्यात नागरी वस्त्यांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली आहे. त्याचबरोबर करवसुलीवरही परिणाम झाला आहे. तरीही उत्पन्नवाढीसाठी गेल्या वर्षभरापासून अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकूणच मागील वर्षीची करवसुली आणि  पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना वस्तुनिष्ठतेवर भर दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

यामध्ये सॅटेलाईट सर्वेद्वारे तसेच प्रत्यक्ष सर्वेनुसार घरपट्टी वसूल होऊ शकणार्‍या मालमत्ता सुमारे दीड लाखांवर नेल्या आहेत. थकबाकी आणि करवसुलीबरोबरच मोबाईल टॉवर्सना घरपट्टी लागू केली आहे. टॉवरचा कर, अग्निशमन विभागाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, क्लासनाही कर लागू केला आहे. यातूनही दोन-अडीच कोटी रुपये उत्पन्न वाढेल. नळ पाणी कनेक्शनही वाढविण्यात आली आहेत. त्यामध्ये अपार्टमेंटमध्ये प्रत्येक फ्लॅटनाही पाणीबिलाची सक्ती केली आहे. मीटर दुरुस्ती, खुल्या भूखंडांना घरपट्टी तसेच दाखल्यांसह विविध करांचा समावेश करून सुमारे 30 कोटी रुपये उत्पन्नवाढीचे टार्गेट ठेवले आहे. शासन अनुदान, स्थानिक उत्पन्न असे सुमारे 675 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक झाले आहे. 

ड्रेनेज, पाणी योजनांसह अनेक अपुर्‍या योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेच. सोबत शहराला सुसज्ज करण्यासाठी स्थानिक पातळीवरही अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. यामध्ये मिरज पंपिंग स्टेशन विकसित करणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दहा लाख रुपयांची तरतूद, महापालिका दवाखान्यांत अत्याधुनिक उपकरणांद्वारे सुसज्ज करण्यात येणार आहे. महापालिकेच्या इमारतीवर सोलर पॅनेल बसवून विजेची बचत करण्यात येईल. महापूर रेषा निश्चिती करून उपाययोजना करण्याचाही निर्णय घेतला आहे.  

नवीन नाट्यगृह बांधणे, वायू प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कृती आराखड्याचीही अंमलबजावणी करण्याचा मानस आहे. पुढील आठवड्यात हे अंदाजपत्रक महासभेत सादर करण्यात येणार आहे.