Fri, Apr 26, 2019 18:09होमपेज › Sangli › कष्टकरी चळवळीचा आधारवड हरपला

कष्टकरी चळवळीचा आधारवड हरपला

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 7:52PMसांगली : प्रतिनिधी

एस. टी. कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांच्या निधनाने  कामगारांसाठी झटणारा, निस्वार्थी, तत्वाशी कधीही तडजोड न करणारा, गोरगरीब, दलितांसाठी चळवळ करणारा नेता हरपला, अशी भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली. एस. टी. कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार झाल्यानंतर अमरधाम स्मशानभूमीत आदरांजली सभा झाली. महापौर हारुण शिकलगार म्हणाले, बिराज साळुंखे यांनी कशाचीही अपेक्षा न ठेवता आयुष्यभर चांगल्या पध्दतीने काम केले, असा नेते यापुढे होणार नाही. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. 
माजी आमदार प्रा. शरद पाटील म्हणाले, बिराज साळुंखे यांच्या जाण्याने कामगारांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची फार मोठी हानी झाली आहे. त्यांनी विद्यार्थी दशेपासून चळवळीला वाहून घेतले.

शेवटपर्यंत समाजवादी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. आजच्या काळात त्यांचे कार्य, विचार सर्वांनी पुढे नेणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. एस. टी. कामगार संघटनेचे नेते हनुमंत ताटे म्हणाले, बिराज साळुंखे यांच्या निधनाने एस. टी. कामगार चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. त्यांनी कामगारांसाठी खूप काही केले आहे. चळवळीसाठी मोठे योगदान दिले. त्यांचा अनेक संघटनांशी संबंध होता. त्यांचा आदर्श घेऊन पुढील चळवळ चालवू. प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, कामगार चळवळीचा नेता कसा असावा याचे मानदंड बिराज साळुंखे यांच्या रुपाने पहायला मिळाले. ते निस्वार्थीपणाने काम करण्याचे एक उत्तम मॉडेलच होते. त्यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेऊन चळवळीला सुरुवात केली. मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. 

शिवसेनेचे शंभूराज काटकर म्हणाले, शिवसेनेचे नेते स्व. आप्पासाहेब काटकर यांच्याबरोबरीने बेळगावच्या सीमालढ्यामध्ये सहभागी होणारा लढवय्या नेता हरपला. बजरंग पाटील म्हणाले, गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे आणि एस. टी. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा देणार्‍या नेत्याची न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.कॉ. धनाजी गुरव म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत सत्ताधार्‍यांकडून एस. टी. चे खासगीकरण करून कामगारांवर अन्याय होत असताना बिराज साळुंखे यांची उणीव भासणार आहे. त्यांच्या जाण्याने गोरगरीब जनतेचे, कामगार चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम म्हणाले, बिराज साळुंखे यांचा सर्व कामगार चळवळींशी संबंध होता.

आणीबाणीचा काळ, कामगारांचे प्रश्‍न यामध्ये ते पुढाकार घेत होते. एका चांगल्या नेत्याला कामगार चळवळ मुकली आहे. कॉ. शंकर पुजारी म्हणाले, बिराज साळुंखे हे एस. टी. कामगारांबरोबरच असंघटित क्षेत्रातील कामगारांचेही नेते होते. त्यांनी आणीबाणीच्या काळात सत्ताधार्‍यांशी संघर्ष केला. समाजवादी विचारधारेशी कधीही बेईमानी केली नाही. आपल्या तत्वांशी ते नेहमीच प्रामाणिक राहिले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबुराव गुरव म्हणाले, बिराज साळुंखे यांनी संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. चारित्र्यसंपन्न कामगार नेता कसा असावा, याचे आदर्श उदाहरण बिराज साळुंखे यांच्या रुपाने होते.  ज्येष्ठ नेते धो. ल. थोरात म्हणाले, एक आदर्श कामगार नेता, प्रभावी मित्र आमच्यापासून दूर गेला. दलितांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात आंदोलन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन ते दलितांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत होते.  एस. टी. कामगार संघटनेचे विलास यादव यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. के. डी. शिंदे  यांनी सूत्रसंचलन केले.