Tue, Jun 18, 2019 23:22होमपेज › Sangli › डास सर्वेक्षणातळीचा पायाच आहे ‘असत्य’!

डास सर्वेक्षणातळीचा पायाच आहे ‘असत्य’!

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:00AMसांगली : उध्दव पाटील

डेंग्यु, चिकुनगुण्या, मलेरियाचा उद्रेकापूर्वीच अटकाव करता यावा यासाठी डास घनता व डासअळी घनता सर्वेक्षण केले जाते. मात्र आरोग्य सेवक आणि कीटक संमहारक यांच्या डास घनतेमध्येच प्रचंड तफावत आढळत आहेे. आरोग्य सेवकांकडून डास घनतेचा वस्तुनिष्ठ ‘हाऊस  इंडेक्स’ समोर येताना दिसत नाही. मात्र तीच गावे कीटक संमहारकांच्या अहवालातून डेंग्यु, चिकुनगुण्या संवेदनशील म्हणून पुढे येत आहेत. डास सर्वेक्षणातळीचा पायाच ‘असत्य’ असल्याचे या तफावतीतून दिसून येत आहे. वस्तुनिष्ठपणे सर्वेक्षण होत नसल्याने डासांचा साम्राज्यविस्तार विनाअडथळा सुरू आहे.   

जिल्ह्यात डेंग्यु, चिकनगुणियाने पुन्हा डोके वर काढले आहे. आता पावसाळा सुरू होतोय. डासोत्पत्ती स्थाने वाढणार आहेत. त्यामुळे डासांच्या संख्येत आणि जनतेच्या त्रासात वाढ होणार आहे. सन 2016 मध्ये डेंग्युचे 129 रुग्न आढळले होते.  जानेवारी ते एप्रिल 2017 मध्ये डेंग्युचे 19 व हिवतापचे 9 रुग्ण आढळले होते. चिकुनगुण्याचा रुग्ण आढळला नव्हता. यावर्षी जानेवारी ते एप्रिल 2018 या कालावधीत डेंग्युचे 18 आणि चिकुनगुण्याचे 34 रुग्ण आढळले. यावर्षी डेंग्युबरोबरच चिकुनगुण्यानेही डोके वर काढले आहे.

डासांचा हाऊस इंडेक्स वादग्रस्त

डेंग्यु, चिकनगुणिया मलेरियावर नियंत्रण ठेवता यावे. कोणत्याही गावात उद्रेक होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जातात. डास घनता, डासअळी घनता पाहण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणाची सारी मदार आरोग्य सेवकांवर आहे. मात्र गावात डासांचे साम्राज्य असूनही त्यांच्या अहवालात डासांची वस्तुनिष्ठ घनता प्रतिबिंबित होताना दिसत नाही. 

डासांचा ‘हाऊस इंडेक्स’ वादग्रस्त

जिल्हा मलेरिया विभागाकडून आरोग्य विभागाकडे समायोजित झालेले आरोग्य सेवक यांच्याकडून डास घनतेसाठी सर्वेक्षण होते डेंग्यु, चिकुनगुण्या, मलेरियाचे रुग्ण आढळलेली गावे, संवेदनशील, अतिसंवेदनशील गावात मात्र कीटक संमहारक यांच्याकडून डास घनता, डासअळी घनता काढली जाते. जिल्हा मलेरिया विभागाकडे केवळ दोन कीटक संमहारक आहेत. दरम्यान काही गावात आरोग्य सेवक आणि कीटक संमहारक यांच्याकडून स्वतंत्रपणे डास घनता, डास अळी घनता काढली जाते. त्यातून डास घनतेतील मोठी तफावत समोर येत आहे. तफावतीची ही परंपरा दरवर्षी विनाखंडीत सुरू आहे. 

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2016 मध्ये हिवतापाचे 53 रुग्ण आढळले. त्यापैकी 6 रुग्ण हे डेंजर समजल्या जाणार्‍या फॅल्सिफेरम हिवतापचे होते. सन 2017 मध्येही फॅल्सिफेरमचे 2 रुग्ण आढळले. जानेवारी ते एप्रिल 2018 या कालावधीत फॅल्सिफेरम हिवतापाचा एक रुग्ण आढळला आहे.डासाचे आयुष्यमान 21 दिवसांचे असते. या कालावधीत तो 100 ते 1000 अंडी घालतो. डेंग्यु, चिकुनगुण्याचा विषाणू पोटात असलेल्या एडिस एजिप्टाय या डासाची अंडीही ‘दुषित’ असतात. या अंड्यातून बाहेर पडणारा डास हा जन्मताच डेंग्यु, चिकुनगुण्या व्हायरसयुक्त असतो. त्यामुळे असा दुषित डास डेंग्यु, चिकुनगुण्याचा प्रसार वेगाने करतो. त्यामुळे डेंग्युल चिकुनगुण्याचा अटकाव करण्यासाठी डासांची अंडीच नष्ट करणे हा प्रभावी उपाय आहे. त्यासाठी ‘ड्राय डे’ महत्वाचा आहे. पाण्याचे साठे दर आठवड्याला एकदा रिकामे करावेत. रांजण, माठ, टाक्या, हौदाच्या आतील बाजू व तळ घासून व पुसून कोरडे करून पुन्हा वापरावेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच लोकसहभागही महत्वाचा आहे.

कवठेपिरानमधील  40 डास ‘एनआयव्ही’कडे

मार्च 2018 मध्ये कवठेपिरान येथे डेंग्युचा उद्रेक झाला होता. या गावात डेंग्युचे 10 रुग्ण आढळले होते. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) पुणे येथील प्रयोगशाळेतील रक्तजल नमुने तपासणीतही या 10 रुग्णांना डेंग्यु असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे 10 रुग्णांपैकी 2 रुग्णांना डेंग्युबरोबर चिकनगुणियाही झाल्याचे आढळून आले. ‘एनआयव्ही’ने अभ्यासासाठी कवठेपिरान येथील काही डास मागविले होते. जिल्हा मलेरिया विभागाने कवठेपिरान येथील 40 एडिस एजिप्टाय डास पकडून पुण्याला ‘एनआयव्ही’कडे पाठविले आहेत. 

आरोग्य सेवकांचे समायोजन; एक ना धड भाराभर चिंध्या? 

जिल्हा मलेरिया विभागाकडे आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी स्वतंत्र यंत्रणा होती. मात्र काही वर्षांपूर्वी ‘मलेरिया’कडील आरोग्य सेवकांचे आरोग्य विभागाकडे समायोजन केले. त्यांना मलेरिया, डेंग्यु, चिकुनगुण्या प्रतिबंध कामापेक्षा आरोग्य विभागाकडील अन्य कामे, लसीकरण, राष्ट्रीय कार्यक्रमांना जुंपलेले असते. त्यामुळेच आणखी काम वाढू नये म्हणून डास घनता चुकत असावी! आरोग्य सेवक, सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञांची रिक्त पदेही जास्त आहेत. ‘जिल्हा मलेरिया’चा कारभार प्रभारी कार्यभारावर सुरू आहे.