Mon, Apr 22, 2019 11:59होमपेज › Sangli › सभागृह उद्घाटन प्रश्‍नावरुन  खडाजंगी

सभागृह उद्घाटन प्रश्‍नावरुन  खडाजंगी

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:14PMमिरज : प्रतिनिधी

पंचायत समितीच्या (स्व. )वसंतदादा पाटील सभागृहाच्या नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रमानिमित्त सत्ताधारी भाजपकडून शिष्टाचार पाळला न गेल्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. या प्रश्‍नावरुन भाजप आणि विरोधी सदस्यांमध्ये शुक्रवारच्या सभेत  चांगलीच खडाजंगी झाली.सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. या मुद्यावरुन सत्ताधारी पक्षाकडून शिष्टाचार पाळला गेला नाही. त्यांना निमंत्रित न करून अवमान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे, अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण, कृष्णदेव कांबळे इत्यादिंनी केला. सत्तारुढ भाजपचा निषेध  केला.

विरोधी सदस्यांच्या या आक्रमक पवित्र्याला उपसभापती काकासाहेब धामणे, किरण बंडगर यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. कार्यक्रमासाठी सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांनीही पंचायत समितीस भेट दिली. तेंव्हा त्यांचे आम्ही स्वागतच केले. असे सांगून उपसभापती धामणे यांनी खासदार राजू शेट्टी यांना तुम्ही किती वेळा बोलवले,  असा उलट प्रश्‍न आमटवणे यांना केला. 

किरण बंडगर यांनी कार्यक्रमासाठी सर्वांना विश्‍वासात घेण्यात आले होते असे सांगितले. भाजप व काँग्रेस सदस्यांमधील वाद वाढत गेल्याने अशोक मोहिते यांनी निषेध नोंदवून घ्या आणि वाद संपवा, असे सांगितल्यानंतर या वादावर पडदा पडला. मोहिते यांनी सभागृहाचे काम चांगले झाले आहे, असा मांडलेला ठरावही मंजूर करण्यात आला.शिक्षकांच्या बदल्यांवरुनही सभेत गदारोळ झाला. विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शिक्षकांची गुणवत्ता न पाहता ऑनलाईन पध्दतीने सरसकट बदल्या करण्यात आल्या आहेत. याचा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे, असा मुद्दा आमटवणे यांनी उपस्थित केला. या विषयास अनुसरुन  बंडगर यांनी तालुका पातळीवर शिक्षकांच्या बदल्या करण्याचे सभापतींना पूर्वीप्रमाणे अधिकार द्यावेत, असा ठराव मांडला. या ठरावास सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला.कृषी विभागावरील चर्चेवेळी सामान्य शेतकर्‍यांना उपयुक्त ठरतील, अशा योजना राबवून त्यांना लाभ द्यावा, अशी मागणी आमटवणे, अशोक मोहिते, कृष्णदेव कांबळे,  बंडगर, विक्रम पाटील, रंगराव जाधव इत्यादींनी केली.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीसाठी पंचायत समिती सदस्यांना अधिकार द्यावेत, मायनर कर रद्द करावा, अशी मागणी  बंडगर, विक्रम पाटील यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीवरुनही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील सभेस अधिकारी न आल्यास पंचायत समिती सभा सार्वजनिक बांधकाम कार्यालयात घेऊ,  असा इशाराही उपसभापती  धामणे यांनी दिला.