Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Sangli › देशातील ‘यंग वर्क फोर्स’ जगाचे भवितव्य घडवेल

देशातील ‘यंग वर्क फोर्स’ जगाचे भवितव्य घडवेल

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 10:04PMसांगली : प्रतिनिधी

देशातील तरुणांमध्ये टॅलेंट आहे. सतत नाविण्याचा शोध घेण्याची आणि कठोर श्रम करण्याची तयारी आहे.  त्यांना कौशल्याची जोड देण्याचे धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अवलंबले आहे. त्यामुळे देशातील ही ‘यंग वर्क फार्स’ केवळ भारताचेच नव्हे तर जगाचे भवितव्य घडवेल, असा विश्‍वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. सांगलीत वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा आठवा पदवी समारंभ बुधवारी मोठ्या जोशात साजरा झाला. संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे प्रमुख पाहुणे होते. शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार संजय पाटील, ‘वालचंद’च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद प्रमुख उपस्थित होते. सन 2017-18 मध्ये बी. टेक. पूर्ण केलेल्या 431 आणि सन 2016-17  मध्ये एम. टेक. पूर्ण केलेल्या 233 विद्यार्थ्यांना पदवी कार्यक्रमात गौरविण्यात आले. 

वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजची जगभर ख्याती आहे. या कॉलेजचे माजी विद्यार्थी देश आणि परदेशातील नामांकित संस्थांमध्ये महत्वाच्या जागी काम करत आहेत, असे गौरवोद‍्गार डॉ. भामरे यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत हा तरुण देश आहे. देशाची 70 टक्के लोकसंख्या 35 वयोगटाखालील आहे. या ‘यंग वर्क फोर्स’ला कौशल्य विकासाची जोड देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. ही यंग वर्क फोर्स केवळ देशाचेच नव्हे तर जगाचे भवितव्य घडवेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

डॉ. भामरे म्हणाले, डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपपेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), डिफेन्स प्रोडक्शन व आयआयटी कॉलेज यांच्यात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट करतोय. ‘डीआरडीओ व वालचंद’ही एकत्र येऊन अशाप्रकारचा प्रोजेक्ट केला जाईल. संरक्षणविषयक साधनसामुग्रीचे डिझाईन आणि त्याचा विकास यासंदर्भात एकत्र येऊन काम केले जाईल. भारत हा सामाजिक-आर्थिक संक्रमणातून जात आहे. संरक्षण व इतर विविध क्षेत्रांसाठी जागतिक बाजारपेठ ही देशाला मोठी संधी आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडियामध्ये इंजिनिअर्सना मोठी संधी आहे, असे डॉ. भामरे यांनी सांगितले. 

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, स्किल्ड इंजिनिअर्सना देश आणि परदेशात मोठी मागणी आहे.  सन 2020 हे वर्ष तांत्रिक इनोव्हेशनचे असेल. उर्जा, शुद्ध पाणीपुरवठा, शहरी व ग्रामीण भागात पायाभूत सेवा, सायबर सुरक्षा यासह विविध चौदा क्षेत्रांमध्ये काम करण्याचे मोठे आव्हान  आणि त्यातून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी मोठी संधी इंजिनिअर्सना आहे. अजित गुलाबचंद म्हणाले, भारतात सध्या पायाभूत सुविधांचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे इंजिनिअर्स व व्यावसायिकांना मोठी संधी आहे. 

खासदार पाटील म्हणाले, वालचंद कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या युवक, युवतींनी स्वत:च्या करिअरबरोबरच सामाजिक बांधिलकी लक्षात घेत लौकिक मिळवावा. संचालक जी. व्ही. परिश्‍वाड म्हणाले, ‘वालचंद’च्या 74 टक्के अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना व 30 टक्के पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकर्‍या मिळाल्या आहेत. 416 पैकी 302 अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना 458 नोकर्‍यांची ऑफर मिळाली आहे. देशातील 22 कॉलेजध्ये ‘एआयसीटी’ने नॅशनल डॉक्टरल फेलोशिपसाठी वालचंदचा समावेश केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॅकिंग फ्रेमवर्कमध्ये  101-150 रँक बँण्डमध्ये कॉलेजचा समावेश झाला आहे. एमटीईचे विजय पुसाळकर, दीपक शिंदे, अशोक सावंत व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.