Thu, Jun 27, 2019 00:16



होमपेज › Sangli › मराठा आरक्षण प्रश्‍न चर्चेनेच सुटू शकतो

मराठा आरक्षण प्रश्‍न चर्चेनेच सुटू शकतो

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 11:54PM



सांगली : प्रतिनिधी

ओबीसीमधून 1962 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत होते. मात्र, त्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच या समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले असल्याचा आरोप मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडकर यांनी शनिवारी येथे केला. 

मराठा सेवा संघाच्या येथील कार्यालयात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते. दरम्यान, त्यांनी आरक्षणाचा प्रश्‍न हिंसक आंदोलनाच्या मार्गाने नाही तर चर्चा आणि न्यायालयीन मार्गानेच सुटू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. 

खेडेकर म्हणाले, आरक्षणाच्या माध्यमातून मोठ्या दंगली व्हाव्यात, यासाठी वातावरण तयार केले जात आहे. अफवा, संशयामुळे अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. सध्याचे आंदोलन नेतृत्वहीन झाले असून सरकार त्याचा गैरफायदा घेत आहे.  

ते म्हणाले, राज्यावर पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांची सर्वाधिक काळ सत्ता होती. मात्र, तत्कालीन  नेत्यांनी कधी आरक्षणाच्या विषयाकडे गंभीरपणे पाहिले नाही.   आरक्षणासाठी देशात आंदोलने होत आहेत.
मराठा समाजातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या शेतीमाल आणि घामाला योग्य दाम मिळाला तर आरक्षण मागण्याची वेळ  येणार नाही. राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, शाहीर पाटील यांचे भाषण झाले. यावेळी डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील आदी उपस्थित होते. 

आरक्षणाचा अनेक नेत्यांनी लाभ घेतला

खेडेकर म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील त्याशिवाय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांचे ओबीसीचे दाखले आहेत. त्यांनी समाजातील इतरांनाही आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. पण तसे होत नाही.

आरक्षणाबाबत सरकार केवळ खेळवत आहे

खेडेकर म्हणाले, मराठे केवळ आरक्षणाच्या मागे लागले आहेत, असे चित्र निर्माण केले जात  आहे. त्यामुळे समाजाच्या इतर मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. या मागण्या सरकारने केवळ कागदावर मान्य केल्या आहेत. प्रत्यक्षात याची अंमलबजावनी झालेली नाही. आरक्षणाबाबत सरकार  खेळवत आहे.