होमपेज › Sangli › खरीप कर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर

खरीप कर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:02PMसांगली : प्रतिनिधी

खरीप हंगाम 2018 साठी जिल्हा सहकारी बँकेने 68 हजार 936 शेतकर्‍यांना 45 हजार हेक्टरसाठी 461.95 कोटी कर्जवाटप केले आहे. खरीप कर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर आहे. बहूसंख्य राष्ट्रीयकृत बँकांची कर्जवाटपात कामगिरी असमाधानकारक असली तरी जिल्हा बँकेने मात्र गतवर्षीपेक्षा 118 कोटी रुपये जादा कर्ज वाटप केले आहे. 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. शेतकरी हितासाठी बँक नेहमीच पुढाकार घेत असते. खरीप हंगामासाठी अधिकाधिक कर्ज उपलब्ध करून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. खरीप हंगामासाठी 555 कोटी रुपये कर्जवाटपाचे ‘टार्गेट’ आहे. सप्टेंबरपर्यंत खरीप कर्ज वाटप होत असते. मात्र, जिल्हा बँकेने दि. 15 जुलैपर्यंतच 461.95 कोटी रुपये कर्ज वाटप करून 83.23 टक्के टार्गेट गाठले आहे. गेल्यावर्षी 15 जुलैपर्यंत 343 कोटी 80 लाख रुपये खरीप कर्ज वाटप केले होते. यावर्षी 15 जुलैपर्यंत 461 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. गतवर्षीपेक्षा 118 कोटी 15 लाख रुपये कर्जवाटप अधिक आहे. सप्टेंबर 2018 पर्यंत ‘टार्गेट’ 100 टक्के किंबहुना त्याहून अधिक पूर्ण होईल. 

जिल्ह्यात ऊस, द्राक्षे, डाळिंब ही प्रमुख नगदी पिके आहेत. दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2018 या कालावधीत ऊस उत्पादक 40 हजार 907 शेतकर्‍यांना 27 हजार 429 हेक्टर उसासाठी 273 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. 4 हजार 616 हेक्टर द्राक्ष बागेसाठी 9 हजार 177 शेतकर्‍यांना 123 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. 2 हजार 133 हेक्टर डाळिंब क्षेत्रासाठी 3 हजार 495 शेतकर्‍यांना 29.66 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. सर्वाधिक 78 कोटींचे कर्जवाटप मिरज तालुक्यात झाले आहे. वाळवा तालुका 68 कोटी, तासगाव तालुका 62 कोटी, कडेगाव तालुक्यात 56 कोटी कर्जवाटप झाले आहे. आटपाडी हा रब्बी पिकांचा तालुका असून खरीपमध्ये सर्वात कमी 20 कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे.