Wed, May 22, 2019 16:58होमपेज › Sangli › दलित व्यक्‍तीस भेदभावाच्या वागणुकीची दखल

दलित व्यक्‍तीस भेदभावाच्या वागणुकीची दखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवराष्ट्रे : वार्ताहर

शिरगाव  (ता. कडेगाव)  येथे विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये वांगी येथील देवानंद दगडू कांबळे यांना प्रवेश नाकारल्यावरून दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. या मंदिरामध्ये मंगळवारपर्यंत प्रशासनाने दलितांना प्रवेश द्यावा, अन्यथा कार्यकर्त्यांसह मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा आरपीआयचे तालुकाध्यक्ष महादेव होवाळ यांनी दिला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्यासह तहसीलदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यासह शिरगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. घडलेली घटना दुर्देवी असून अज्ञानातून घडली आहे. यातून कोणत्याही समाजाला जाणूनबुजून दुखवण्याचा हेतू नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आरपीआयचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बोधिसत्व माने यांनी आम्हाला त्या मंदिरात प्रवेश करायचा आहे, असे सांगितले.आधुनिक महाराष्ट्रात अशा घटना घडणे म्हणजे दुर्दैव असल्याची भावना त्यांनी मांडली. आम्हाला कोणाविरूध्द गुन्हा दाखल करावयाचा नसून मंदिरात प्रवेश करून समाजातील अनिष्ट रूढींना फाटा द्यायचा आहे, असे मत मांडले.

समाजकल्याण अधिकारी यांनी ग्रामस्थांना रूढी परंपरा याबाबत माहिती सांगितली. अशा घटनांमधून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होऊन गावातील वातावरण दूषित होते.याबाबत ग्रामस्थांनी  चर्चा करून हा प्रश्‍न सोडवावा. अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, कडेगावच्या तहसिलदार अर्चना शेटे, चिंचणी वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, तलाठी गौसमहंमद लांडगे, ग्रामसेवक महादेव मोहिते, शिवाजी देवकर, संतोष बर्गे, परशुराम माळी, जीवन करकटे, सूरज माने, दस्तगिर फकीर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंदिरात प्रवेश करणार

महादेव होवाळ म्हणाले,प्रशासनाला आमची मागणी कळवली आहे. मंगळवारपर्यंत प्रशासनाने पुढाकार घेऊन दलितांना मंदिरात प्रवेश द्यावा. अन्यथा दलित समाजातील लोकांसह मंदिरात प्रवेश करू.