सांगली : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी काँगे्रसच्या स्थानिक नेत्यांनी नागपुरात पार्लमेंटरी बोर्डासमोर प्रबळ उमेदवारांसह 50 जागा लढविण्याचा दावा करीत अहवाल सादर केला. यावेळी पार्लमेंटरी बोर्डात राष्ट्रवादीशी आघाडी करावी, न करावी याबाबतही चर्चा रंगली. अखेर प्रदेश काँगेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतरच आघाडीचा फैसला होईल, असा निर्णय घेण्यात आला.
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी करण्यात येणार आहे. त्याला प्रदेश पातळीवरूनही दुजोरा दिला आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या शहर जिल्हाध्यक्षांनी परस्परांना प्रस्तावही दिले आहेत. परंतु जागा वाटपावर एकमत होणे कठीण झाले आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला 20 जागांची ऑफर दिली होती. तर राष्ट्रवादीने काँग्रेसकडे 43 जागांची मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची बोलणी थांबली आहे.
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. आघाडी व्हावी, असा सूर दोन्हीकडून असला तरी काही प्रभागांमध्ये दोन्हींकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला थांबवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे आता जागावाटपाचा हा प्रश्न दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर सोपविण्यात आला आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीचे सदस्य आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अभय छाजेड यांनी बुधवारी नागपुरात काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाशी चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, नसीमखान, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
महापालिकेतील काँग्रेसची सद्यस्थिती, निवडणूकपूर्व सर्व्हेक्षणाचा अंदाज या सर्वांचा अहवाल सादर करण्यात आला. राष्ट्रवादीने दिलेला प्रस्ताव व स्थानिक नेत्यांचे याबाबतचे मतही सांगण्यात आले. कोअर कमिटीने काँग्रेसने 78 पैकी 50 पेक्षा कमी जागा कोणत्याही परिस्थितीत घेऊ नयेत, असे ठासून सांगितले. प्रसंगी काँगे्रेस स्व:बळावर लढली तरी बहुमतापर्यंत जाऊ शकते, असा अंदाजही व्यक्त केला. प्रसंगी स्वतंत्र लढून नंतर एकत्र यावे, असेही मत काहींनी व्यक्त केले.
भाजप, सेना, सुधार समिती प्रतीक्षेत
काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे घोडे अडले आहे. दुसरीकडे भाजपचेही अद्याप उमेदवार यादी निश्चितीबाबत ‘वेट अँड वॉच’ सुरू आहे. प्रसंगी अन्य पक्षांतून तुल्यबळ उमेदवार मिळाल्यास सत्तेसाठी सोईस्कर होईल, असे भाजप नेत्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांची यादीही शनिवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. शिवसेनेची यादीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे. त्यानंतर अन्य पक्षांतून नाराज प्रबळ उमेदवार आल्यास त्यांना घेऊनच यादी निश्चित होणार आहे. जिल्हा सुधार समितीने मात्र पहिली यादी जाहीर केली. अन्य जागांबाबतही त्यांचा शोध सुरू आहे.
राष्ट्रवादीचा प्लॅन ए, प्लॅन बी तयार
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचीही सांगलीत बैठक झाली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, प्रा. पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील, शहराध्यक्ष सागर घोडके, युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार आदी उपस्थित होते. बैठकीत आघाडी झाल्यास प्लॅन ए नुसार उमेदवार ठरविण्यात आले. आघाडी झालीच नाही, तर प्लॅन बी नुसार 78 उमेदवारांचीही यादी तयार करण्यात आली. काँगे्रेससोबत चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनाही ती यादी पाठविण्यात आली.