Sun, Jul 21, 2019 12:12होमपेज › Sangli › आचारसंहिता आली, प्रचाराची लगीनघाई

आचारसंहिता आली, प्रचाराची लगीनघाई

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 8:39PMसांगली : अमृत चौगुले

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आठवड्याभरात (20 ते 22 जून) लागू होणार आहे. जुलैअखेर मतदानाची शक्यता आहे. त्यामुळे आता उमेदवारांबरोबरच सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला आणि प्रचार, संपर्क अभियानाला गती देण्यात आली आहे.  सोबतच महापालिका प्रशासनाकडूनही निवडणूक प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. 

महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समितीसह अनेक पक्षांकडून स्व:बळाबरोबरच सोयीस्कर आघाडी, युतीच्या फॉर्म्युल्यांवरही खल सुरू झाला आहे.
महापालिकेत काँग्रेस सत्ताधारी, राष्ट्रवादी विरोधक, तर अन्य पक्षीय स्वाभिमानी विकास आघाडी आहे. परंतु आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपने तगडे आव्हान देण्याची तयारी केली आहे. केंद्र, राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आता मिशन महापालिका मोहीम राबविली आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून इनकमिंग फॉर्म्युल्याबरोबरच जनतेतून विरोधकांबद्दल नाराजी इनकॅश करण्याबाबत संपर्क अभियान सुरू ठेवले आहे. 

एकूणच यामुळे भाजपला स्पर्धक टार्गेट ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीने आता आघाडीचा सूर आळवला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लहान भाऊ म्हणत केंद्र, राज्याबरोबरच महापालिकेतही भाजपला रोखण्यासाठी आघाडीची खुली ऑफरही दिली आहे. परंतु ‘बडे भाई’ असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र एक आघाडी तर एक स्व:बळ असे दोन मतप्रवाह आहेत. प्रसंगी आताच आघाडीची घोषणा केल्यास इच्छुकांत नाराजीची भीती आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी तर हा निर्णय स्थानिक नेत्यांवर ढकलला आहे. परंतु स्थानिक नेत्या जयश्री पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, युवकचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी मंत्री प्रतिक पाटील, युवानेते विशाल पाटील यांच्यातही याबाबत एकमत होईना. सर्वांचा कमी-जास्त प्रमाणात आघाडीचा सूर आहे. पण ही आघाडी निवडणुकीपूर्वी की नंतर यावर खल सुरू आहे. शिवाय उमेदवारीत फेरबदलाबरोबरच जागा वाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी 70-30 असा प्रस्ताव पुढे आल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत निर्णयासाठी बैठक घेण्याची चर्चा सुरू आहे.

भाजपनेही गेल्या आठवड्यात मिरजेतील 12-13 आजी-माजी नगरसेवकांचे इनकमिंग केले. सांगलीतील अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी गळाला लावले आहेत. सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीत उमेदवारी न मिळाल्यास प्रबळ पर्याय उपलब्ध होतील त्यादृष्टीनेही शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शेखर इनामदार,  माजी आमदार दिनकर पाटील आदींनी फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी प्रभारी मुख्यमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे ‘वजन’ लावण्यात आले आहे. जोडीला आता नाराज असलेल्या खासदार संजय पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाचे बक्षीस देऊन मनधरणी करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील त्यांच्याशी सलगी असणारे आजी-माजी नगरसेवक आता त्यांच्या माध्यमातून भाजपकडे वळू शकतात. त्यादृष्टीने त्यांचीही ताकद पणाला लागू शकते. त्यामुळे भाजपच्या सत्तेसाठी मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार गजानन कीर्तीकर, संपर्कनेते प्रा. नितीन बाणुगडे-पाटील यांनीही सांगलीत शिवसेना बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दोन्ही जिल्हाप्रमुखांसोबतच नगरसेवक शेखर माने, जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्या माध्यमातून जुन्या स्थानिक गटांची बांधणी सुरू आहे.  माजी आमदार संभाजी पवारांच पुत्र पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार यांनी मनपा निवडणुकीत शिवसेनेसोबत असे जाहीर केले आहे. अर्थात त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच भाजपमधील नाराजही शिवसेनेच्या गळाला लागू शकतात. त्यादृष्टीनेही आता हालचाली गतीमान आहेत.जिल्हा सुधार समितीचा अंकुश आहे. परंतु यावेळी निवडणुकीतच्या मैदानात उतरून शहर विकासाचे मॉडेल देण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी आपलाही त्यांनी सोबत घेतले आहे. त्यांना देश-विदेशातून पाठबळ मिळू लागले आहे. पुरोगामी 13 हून अधिक संघटनांनी एकीची मोट बांधत शहराला चांगला पर्याय देऊ असा निर्धार केला आहे.  

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने महापालिका प्रशासन आता सज्ज झाले आहे. यानुसार एकूण 4 लाख 23 हजार मतदार 78 नगरसेवकांचे भवितव्य ठरविणार आहेत. यामध्ये 18 प्रभागातील नागरिक 4 नगरसेवक, तर दोन प्रभागातील नागरिक तीन नगरसेवक ठरविणार आहेत. यासाठी सांगली, मिरज व कुपवाड शहरात सुमारे 450 मतदार केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर 750 ते 800 मतदार मतदान करतील. यासाठी एकूण अडीच हजारांवर निवडणूक कर्मचार्‍यांचा राबता सुरू आहे. तीन ते चार प्रभागांसाठी तहसीलदार दर्जाचा एक निवडणूक अधिकारी व  आचारसंहिता कक्ष व एकूण नियंत्रणासाठी दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.