Sat, Aug 24, 2019 23:51होमपेज › Sangli › ‘स्थळ पाहणी’चा निर्णय ‘सीईओ’ घेणार

‘स्थळ पाहणी’चा निर्णय ‘सीईओ’ घेणार

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 25 2018 8:04PMसांगली : प्रतिनिधी

बांधकाम विभागाकडील कामांना स्थळ पाहणी दाखला अनिवार्य करावा अथवा नाही याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी घ्यावा, असा निर्णय गुरूवारी स्थायी समिती सभेत झाला. स्थायी समिती सभा अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, ब्रह्मदेव पडळकर, सदस्य सत्यजीत देशमुख, डी. के. पाटील, संभाजी कचरे, अर्जुन माने, नवले, सुरेखा आडमुठे, सुनीता पवार, अश्‍विनी पाटील व खातेप्रमुख उपस्थित होते. बांधकाम विभागाकडील कामांच्या निविदेसोबत स्थळ पाहणी दाखला  जोडण्यावरून तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय सीईओ घेतील असे ठरले. 

लग्न, सार्वजनिक कार्यात भोजनातून विषबाधेचे काही प्रकार घडले आहेत. आरोग्य विभागाने याबाबत दक्षता घ्यावी. बर्फ तयार करणार्‍या फॅक्टरींची तपासणी, शुद्ध पाण्याच्या वापराद्वारे बर्फ निर्मिती तसेच अन्नपदार्थात बर्फ न टाकता अन्न पदार्थाच्या भांड्याभोवती बर्फ पसरून थंड करणे याबाबत मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले. छोटे पाटबंधारे विभागाकडे कामांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने भाडेतत्त्वावर वाहन उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढवणे, कामे गतीने पूर्ण करणे यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करावे.मंजुर कामे पंधरा दिवसात पूर्ण करण्याबाबत सुचना द्याव्यात. यांत्रिकी विभागाकडील विंधन विहिरींची कामे पंधरा दिवसात सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

सर्व समित्यांचा कार्यवृत्तांत स्थायी सदस्यांना द्या

स्थायी समिती सदस्यांना विषय समिती सभेचा कार्यवृत्तांत कळाला पाहिजे. त्यासाठी विषय समिती सभांचा कार्यवृत्तांत सर्व विभागांनी मुदतीत स्थायी समिती सदस्यांना द्यावा, अशा सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. 

आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना जिल्ह्याबाहेर सोडू नका

आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात येणारे सर्व शिक्षक आल्याशिवाय सांगली जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर जाणार्‍या शिक्षकांना सोडू नये, अशी सूचना स्थायी समिती सभेत अधिकार्‍यांना दिली.