Thu, Apr 25, 2019 07:37होमपेज › Sangli › काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘दलदलीत’ फुलले भाजपचे कमळ!

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘दलदलीत’ फुलले भाजपचे कमळ!

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 11:31PMसांगली : सुनील कदम

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील भाजपच्या विजयाचे विश्‍लेषण करायचे झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने करून ठेवलेल्या गैरकारभाराच्या चिखलात भाजपने आपले आश्‍वासक कमळ फुलविले असेच करावे लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सुरुवातीपासून दिसून येत असलेली बेबंदशाही त्यांना नडलेली दिसते, तर भाजपने सुरूवातीपासून शेवटपर्यंत केलेले सूत्रबध्द नियोजन त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभार्‍यांनी गेल्या वीस वर्षात महापालिकेत केलेल्या भ्रष्टकारभारावर मतदारांनी आसूड ओढल्याचे स्पष्ट झाले आहे.  तीन-तीन माजी महापौरांना पराभूत करून लोकांनी महापालिकेतील कारभाराच्या शुध्दीकरणाची सुरूवात केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महापालिकेतील भाजपचा विजय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांसाठीही धक्कादायक असून त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या वीस वर्षातील कारभाराबद्दल मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत केवळ 61 टक्के मतदान झाले होते. लोकांना बदल हवा होता, तो त्यांनी मतपेटीतून घडवून आणला आहे. कोणत्याही बाह्य घटकांचा विचार न करता केवळ या शहराचा विकास हीच एकमेव अपेक्षा ठेवून मतदारांनी हा बदल घडवून आणला आहे. त्यामुळे आता या शहराच्या विकासाची धुरा आपसूकच भाजपच्या खांद्यावर आलेली आहे. त्यामुळे भाजपला यापुढे केवळ विकासाचेच सुशासन करावे लागणार आहे.

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड वाटत होते. दोन्हीकडे तोलामोलाचे उमेदवार सर्व सिध्दतेने सज्ज दिसत होते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी विजयाची खात्री वाटत होती, त्यांच्या बोलण्यातून हा विश्‍वास पदोपदी जाणवून येत होता. कार्यकर्त्यांमध्ये तर हाच आत्मविश्‍वास इतक्या मोठ्या प्रमाणात होता की दोन्ही काँग्रसची आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून अगदी शेवटच्या टप्प्यात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला.

त्यातही पुन्हा सावधगिरीचा दुसरा उपाय म्हणून आपले नाराज लोक भाजपच्या हाताला लागू नयेत यासाठी अगदी अखेरच्या क्षणी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाराजांना फार काही खळखळ करता आली नाही. तसेच ऐनवेळी भाजपशी हातमिळवणी करण्याचीही त्यांना उसंत मिळाली नाही. त्यामुळे उमेदवारी वाटपातच निम्मी बाजी मारल्याची हवा आघाडीच्या गोटात निर्माण झाली होती.

आघाडीच्या बरोबर नेमकी उलट अवस्था भाजपची होती. आघाडीच्या उमेदवारांच्या तुलनेत भाजपकडे तुल्यबळ उमेदवारांची वानवा दिसून येत होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची बरीचशी मदार आघाडीतील नाराजांवर अवलंबून होती. ऐनवेळी आघाडीतील नाराज आणि दिग्गज मंडळी आपल्या हाताला लागतील, अशी त्यांची अटकळ होती. त्यामुळे अगदी अखेरच्या क्षणापर्यंत भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे निश्‍चित केली नव्हती. मात्र आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या चालीमुळे भाजपच्या हाताला फार काही लागू शकले नाही आणि हाती असतील त्या उमेदवारांचा ताळमेळ घालत भाजपला आपल्या उमेदवारांची नावे निश्‍चित करावी लागली.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करताना आणि उमेदवारांची नावे निश्‍चित करताना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी काही प्रमाणात भाजपला शह देण्यात यश मिळवले, पण त्यानंतर मात्र कुणाचाच पायपोस कुणाच्या पायाला नाही अशी आघाडीची अवस्था झाली. 

स्व. पतंगराव कदम आणि स्व. मदन पाटील यांच्या पश्‍चात काँग्रेसकडे त्या तोलामोलाचे नेतृत्व नव्हते आणि जे नेते म्हणून पुढे आले होते, त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने असल्याचे जाणवून येत होते. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वहीन होती, असे समजण्यास हरकत नाही. 

काँग्रेसने नेतृत्वाची धुरा ज्यांच्या खांद्यावर सोपवली होती, त्या आमदार सतेज पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना सांगलीच्या राजकारणाची नस सापडू शकली नाही. नाही म्हणायला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रचारसभांनी काँग्रेसच्या प्रचारात काहीशी जान भरण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून फार साध्य झाले नसल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निवडणुकीत एकहाती नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक कार्यकर्त्यांमधील सावळ्या गोंधळामुळे राष्ट्रवादी अपेक्षित टप्पा गाठण्यात अपयशी ठरली. आघाडी झाली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांचे मनोमीलन या निवडणुकीत झाले नसल्याचे प्रकर्षाने जाणवून येत होते. त्याचप्रमाणे उमेदवार आणि कार्यकर्त्यांपर्यंत ‘रसद’ पुरविण्यावरूनही आघाडीच्या नेत्यांमध्ये ताकतुंब्याचा खेळ रंगलेला बघायला मिळत होता. त्यामुळे ऐन निवडणुकीत आघाडीच्या अनेक उमेदवारांना ‘उपासमार’ सहन करावी लागली आणि त्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागला.

निवडणुकीच्या सुरूवातीपासून भाजप काही प्रमाणात बॅकफूटवर गेल्यासारखा वाटत होता. काँग्रेस-राष्ट्रवादीतील ज्या आयारामांवर त्यांची भिस्त होती, ते काही त्यांच्या हाताला लागू शकले नाहीत. त्यामुळे अगदी ऐनवेळी हाताशी उपलब्ध असलेल्यांची गोळाबेरीज करून भाजपला आपला उमेदवारांचा कोटा पूर्ण करावा लागला. त्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय सुनियोजीत आणि सुत्रबध्द पध्दतीने प्रचारयंत्रणा राबविल्याचे दिसले. 

निवडणुका जिंकण्याचे तंत्र अवगत असलेल्या अनेक दिग्गजांना आपलेसे करून भाजपने सर्व साधनसामग्री त्यांच्या दिमतीला देऊन त्यांना कामाला लावले होते. एक बूथ आणि पंचवीस यूथचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. आघाडीची मंडळी प्रचारसभा, रॅली, कोपरासभा या पारंपारिक प्रचारात गुंतलेले असताना भाजपचा प्रचार मात्र अत्यंत हायटेक आणि गुप्त पध्दतीने चालल्याचे आढळून येत होते. 

बुथनिहाय भाजपची प्रचारयंत्रणा रोजच्या रोज मतदारांच्या संपर्कात असल्याचे आढळून येत होती. जोडीला भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा प्रचारासाठी अतिशय सूत्रबध्दरीतीने वापरही चालवला होता. परंपरागत आणि पारंपारिक प्रचारात रमलेल्या आघाडीच्या नेत्यांना आणि उमेदवारांना भाजपच्या या प्रचार यंत्रणेची जाणीव होईपर्यंत निवडणुकीचे  निकाल त्यांच्या हातात येऊन पडले होते.
महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदारांसमोर आजच्याप्रमाणे वेगवेगळे पर्याय उपलब्ध नव्हते. त्याचप्रमाणे ज्यांच्या खांद्यावर विश्‍वासाने मान टाकावी, असे सक्षम राजकीय पर्यायही मतदारांपुढे उपलब्ध नव्हते. त्यामुळे ‘उडदामाजी काळे गोरे, काय  निवडावे’ अशी द्विधा मनस्थिती मतदारांची होत असे. त्यामुळे आज याला आणि उद्या त्याला निवडून देण्याशिवाय मतदारांपुढे पर्यायच नसायचा. त्याचा परिणाम असा झाला की कोट्यवधी रूपयांच्या  भ्रष्टाचाराचे आरोप होऊनसुध्दा वर्षानुवर्षे तीच तीच मंडळी सत्तेवर ठाण मांडून बसली होती. 

शेरीनाला शुध्दीकरण योजना, भुयारी गटार योजना, सुधारित पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, गुंठेवारी नियमितीकरण योजना, वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना अशी महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊनसुध्दा पर्यायाअभावी तीच तीच मंडळी सत्तेवर येत होती.

पण यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या रूपाने मतदारांना एक चांगला पर्याय दिसून आला होता. त्यामुळे  काँग्रेसच्या नेत्यांनी नोटाबंदी, जीएसटी, बँक घोटाळे अशासारख्या देशपातळीवरील प्रश्‍नांना चूड देऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी या सगळ्यापेक्षा या शहराच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे दिसते. 

यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या भल्या भल्या दिग्गजांना धूळ चारून लोकांनी भाजपच्या नवख्या उमेदवारांच्या पारड्यात आपले दान टाकले आहे, याचाच अर्थ लोकांना यापूर्वीचा कारभार रूचलेला नाही. त्यामुळेच त्यांनी आता विकासाच्या वाटेवर नेणार्‍या नव्या कारभार्‍यांच्या हातात महापालिका कारभाराची सुत्रे सोपविली आहेत.

महापालिकेतील आजपर्यंतच्या कारभाराला विटलेल्या लोकांनी मोठ्या विश्‍वासाने आणि मुख्य म्हणजे या शहराच्या विकासाच्या हेतूने महापालिकेची सुत्रे भाजपच्या हाती सोपविली आहेत. त्यामुळे भविष्यात भाजपला लोकांना अपेक्षित असलेल्या विकासाच्या मार्गाने महापालिकेचा कारभार करावा लागणार आहे. त्यादृष्टीने स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची जबाबदारी भाजपला आता पेलावी लागणार आहे. महापालिका आणि गैरव्यवहार याचे यापूर्वी दृढ झालेले समीकरण मोडून भाजपला भविष्यात पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर द्यावा लागणार आहे. या शहराच्या विकासाच्या बाबतीत नागरिकांची काही स्वप्ने आहेत आणि ती स्वप्ने साकार करायची जबाबदारी आता भाजपला पार पाडायची आहे. या शहराच्या विकासाच्या ज्या काही योजना आहेत, त्या साकार करण्यासाठी भाजपच्या नेत्यांना आपले इतिकर्तव्य पार पाडावे लागणार आहे.

म्होरक्यांचा भाजपच्या विजयाला हातभार!

काँग्रेस-राष्ट्रवादीत असे काही म्होरके आहेत की ज्यांना निवडणुका कशा लढवायच्या आणि कशा जिंकायच्या याची अचूक कला अवगत आहे. स्व.मदन पाटील यांनी सांगलीचे राजकारण करताना असे काही म्होरके नेहमी आपल्या पदरी बाळगले होते. मात्र त्यांच्या पश्‍चात आघाडीच्या नेत्यांना हे म्होरके सांभाळून ठेवता आले नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून दिलीप सूर्यवंशी आणि सुरेश आवटी हे दोन हुकमी एक्के ऐनवेळी भाजपच्या हाताला लागले. त्याची फार मोठी किंमत  या निवडणुकीत आघाडीला चुकवावी लागल्याचे दिसते. केवळ या दोघांनीच आपल्या ताकदीवर भाजपचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल बारा नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे भाजपच्या विजयात या दोन म्होरक्यांचे फार मोठे योगदान दिसून येते.

गावभागाची संभाजी पवारांपासून फारकत!

सांगली शहरातील गावभाग आणि संभाजी पवार यांचा पूर्वीपासून राजकीय ऋणानुबंध आहे.  पवार ज्या पक्षात त्याला गावभागाची मते असे समीकरण होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपपासून फारकत घेतलेल्या पवार पुत्रांनी या भागात वेगळी आघाडी करून आपले काही उमेदवार उभे केले होते. मात्र गावभागातील मतदारांनी संभाजी पवारांपासून फारकत घेतल्याचे आढळून आले. चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी चांगल्या मताधिक्क्याने यश मिळवले. संभाजी पवार यांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांच्या राजकीय पावलावर पाऊल टाकणार्‍या मतदारांनी या निवडणुकीच्या निमित्ताने आपली वेगळी वाटचाल अधोरेखित केली आहे.

सांगली म्हणजे काँग्रेस हे समीकरण बदलले!

सांगली नगरपालिका आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या महापालिकेवर गेल्या पन्नास-साठ वर्षात सातत्त्याने काँग्रेसचीच सत्ता होती. सांगली आणि काँग्रेस हे एक समीकरणच होते. 1975 साली सांगलीतील जनतेने थेट नगराध्यक्ष म्हणून नागरिक संघटनेच्या डॉ. देवीकुमार देसाईंना निवडून दिले होते, मात्र  अन्य बहुसंख्य सदस्य हे काँग्रेसचेच होते. 2008 मध्ये जयंत पाटील यांनी महाआघाडीच्या माध्यमातून महापालिकेची सत्ता काबीज केली होती. मात्र महाआघाडीतील बहुसंख्य नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच होते. कोणत्याही राजकीय पक्षाला येथे काँग्रेस विरोधात निर्भेळ यश मिळालेले नव्हते त्या पार्श्‍वभूमीवर भाजपला मिळालेले हे निर्भेळ यश हा त्यांच्यासाठी एक सुखद आणि आश्‍चर्यकारक धक्काच आहे.

स्वबळावर लढले हेच काय ते शिवसेनेचे यश!

सत्तेत एकमेकांचे भागीदार असतानाही राज्याच्या राजकारणात भाजपशी उभा दावा मांडणार्‍या शिवसेनेने महापालिका निवडणुकीतही आपला सवतासुभा मांडला होता. महापालिका क्षेत्रात शिवसेनेचे अस्तित्व नाममात्र असतानाही हाती लागेल त्या सगळ्यांची गोळाबरीज करून शिवसेनेने या निवडणुकीत 56 उमेदवार उभा केले होते. प्रचारासाठी शिवसेनेच्या राज्यपातळीवरील काही नेत्यांनी चांगलेच रान उठविले होते. मात्र त्यांच्या हाती काहीही लागू शकले नाही. 56 उमेदवारांना मिळून  36 हजार मते पडली आहेत. त्यामुळे मुळातच नाममात्र अस्तित्व असलेल्या शिवसेनेने या निवडणुकीत स्वबळावर इतके उमेदवार उभे केले हेच त्यांचे यश म्हणावे लागेल.