Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Sangli › काँटे की टक्कर जिंकल्याने कार्यकर्त्यांचा विजयोत्सव; फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूक 

भाजपचा जल्लोष

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 10:05PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेत भाजपने जोरदार बाजी मारल्याने कार्यकर्ते व   पदाधिकार्‍यांच्या आनंदाला उधाण आले होते. तीनही  शहरात सर्वत्र कार्यकर्त्यांचा दुपारनंतर जल्लोष सुरू होता. आमदार सुधीर गाडगीळ यांचे कार्यालय अक्षरश: गुलालात न्हाऊन निघाले होते. अनेकांनी शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत  विजयी  मिरवणुका काढल्या.

मिरज येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीच्या  ठिकाणी कार्यकर्ते व उमेदवारांनी गर्दी केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या तीन  प्रमुख पक्षांचे दुसर्‍या फळीतील पदाधिकारीही मतमोजणीच्या ठिकाणी आले होते.  सर्वांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त अधिक कडक केला. कार्यकर्त्यांना तपासणी करूनच आत सोडले जात होते. मतमोजणी केंद्राबाहेर निकाल ऐकण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. 

निकाल हळूहळू हाती येऊ लागला. पहिल्या तासाभरात आघाडी व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. 11 वाजण्याच्या सुमारास आघाडीचे 20 उमेदवार तर भाजपचे  12 उमेदवार असे अंतर पडले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भाजपला प्रभाग 15 मध्ये सर्व उमेदवार पराभूत झाल्याने मोठा धक्का बसला. याठिकाणी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले. 

यानंतर कुपवाडमध्ये आघाडीचे धनपाल खोत, माजी महापौर किशोर जामदार पराभूत झाल्याने व मिरजेतील प्रभाग 7 मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना काहीसे हायसे वाटले. पण यानंतर पारडे पुन्हा फिरले. प्रभाग 6 व प्रभाग 1 मध्ये आघाडीच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली. सांगलीवाडीच्या निकालाची उत्सुकताही शेवटपर्यंत ताणली गेली. याठिकाणी भाजपने तीनही जागा जिंकल्या. प्रभाग 16 या खणभागातील निकालावर पैजा लागत होत्या. दुपारी दोन वाजल्यानंतर मात्र निकालाचा कल अचानक बदलू लागला.  माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना प्रभाग पाचमधून पराभवाचा धक्का बसला. निकालात एकदम जबरदस्त व्टिस्ट आला. अनेक प्रभागात भाजपचे उमेदवार धडाधड विजयी  होऊ लागले. 39 जागांवर आघाडी घेत भाजपने सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. यामुळे निरुत्साही  झालेल्या भाजप कार्यकर्त्यांत एकदम चैतन्य निर्माण झाले. भाजपची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याने मतमोजणीच्या ठिकाणाहून आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट होताच  कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या आनंदाला उधाण आले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी शहरात व प्रभागात मोटारसायकल रॅली काढून जल्लोष केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आल्या.

विजयी उमेदवारांनी आमदार सुधीर गाडगीळ    यांच्या   कार्यालयासमोर   जाऊन जल्लोष केला. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी गुलालात न्हाऊन निघाले होते. कार्यकर्त्यांनी नेते व पदाधिकार्‍यांनाही गुलालांनी रंगविले.  शहरात ज्या-ज्या प्रभागात विजय झाला तेथेही भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करीत विजयोत्सव साजरा केला. पक्षाचे नेतेही कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते.

निकालाकडे लागले होते जिल्ह्याचे लक्ष 

निवडणुकीत भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात कांटे की टक्कर  होती. यात कोण बाजी मारणार याकडे सार्‍या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तीनही पक्षांचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व  नागरिकांमध्ये निकालाची मोठी उत्सुकता लागली होती. मिनिटा-मिनिटाला निकालाचे अपडेट घेतले जात होते. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात होता. 

शिवसेना, लोकशाही आघाडी, सुधार समितीवाले गायब

निकालात भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली. स्वाभिमानी विकास आघाडीलाही  एक जागा मिळाली.परंतु शिवसेना, लोकशाही आघाडी व सुधार समितीला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजप, आघाडीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते जल्लोष करीत होते. पण पराभवामुळे सेना, लोकशाही आघाडी व सुधार समितीचे नेते, कार्यकर्ते गायब झाले होते.

पराभवामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची कार्यालये पडली ओस 

पहिल्या टप्प्यात निकालाचा कल आघाडीच्या बाजूने झुकला होता. त्यानंतर भाजपने जोरदार टक्कर दिल्याने दोन्ही बाजूच्या जागा सम-समान झाल्या.  काही काळ भाजप पुढे तर काही वेळा आघाडी पुढे असे चढाओढ सुरू होती.  दोन्ही बाजूंनी धाकधूक वाढत होती. अंतिम निकाल हाती आल्यानंतर भाजपच्या  कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. मात्र त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यालयात सन्नाटा पसरला होता. 

कार्यकर्त्यांचा शहरात दिवसभर जल्लोष

मतमोजणीचे सुरुवातीचे निकाल आघाडीच्या बाजूने होते. त्यामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली. दुपारनंतर मात्र  भाजपची सरशी होत असल्याचे दिसू  लागले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. दुपारी साडेचारच्या सुमारास 41 जागांवर विजय मिळवत भाजपने सत्ता मिळवली आणि त्यानंतर जल्लोष आणखी वाढला.