Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Sangli › भाजपने कितीही पैशाचा पाऊस पाडावा

भाजपने कितीही पैशाचा पाऊस पाडावा

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:31PMसांगली : प्रतिनिधी 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने कितीही पैशाचा पाऊस पाडला तरी  त्याचा काही उपयोग होणार नाही. शिवसेना मोठ्या ताकदीने उतरत असल्याने मतांचा पाऊस मात्र आपल्या उमेदवारांवर पडणार आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तयारी लागा, असे आवाहन खासदार गजानन किर्तीकर यांनी आज येथे केले. 

येथील वसंतदादा मार्केट यार्डमधील सभागृहात शिवसेना पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.  ते म्हणाले, मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून सेनेने उत्तम कारभार केला आहे. आता सर्वच निवडणुका मोठ्या ताकदीने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे रोड शो करणार आहेत. पक्षाचे सर्व मंत्री प्रचारासाठी येथे येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण असणार नाही. सर्वच पातळीवर मदत देण्यात येईल. आचारसंहिता कधी लागणार याची वाट न पाहता शिवसेनेची भूमिका प्रत्येक घरापर्यंत पोहचवा. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. 

सेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख नितीन बानुगडे - पाटील म्हणाले, सांगलीकर जनतेने आतापर्यंत शिवसेना वगळता सर्व पक्षांना संधी देऊन पाहिले. मात्र कोणालाच चांगला कारभार करता आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी. यावेळी सेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव म्हणाले, आपले विरोधक मोठ्या तयारीने उतरले आहेत. आपणही आम्हाला ताकद द्यायला हवी. शेखर माने, गौतम पवार यांची भाषणे झाली. जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी प्रास्ताविक केले. शंभुराज काटकर यांनी सूत्रसंचालन केले. 

सध्याच्या कारभार्‍यांना शरम वाटली पाहिजे

सांगली महापालिका भ्रष्टाचारात बुडाली आहे. एकदा सत्ता हातात घेतल्यानंतर मनमानी कारभार चालतो. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. याची सध्याच्या कारभार्‍यांना शरम वाटली पाहिजे. यापुढे मात्र आता शिवसेना हे चालू देणार नाही, असे खासदार किर्तीकर यांनी सांगितले.