Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Sangli › सांगलीत जुन्या न्यायालय इमारतीला निरोप

सांगलीत जुन्या न्यायालय इमारतीला निरोप

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 10:42PMसांगली : वार्ताहर

वकील संघटनेच्यावतीने सांगली येथील 110 वर्षांपूर्वीच्या न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा निरोप समारंभ शुक्रवारी झाला. विविध वक्त्यांनी न्यायालयीन कामकाजाच्या आठवणींना उजाळा दिला. 
संस्थान काळात सन 1908 मध्ये तत्कालीन पटवर्धन संस्थानिकांनी राजवाडा चौक येथे न्यायालयाची ही इमारत बांधली होती. सुरुवातीला म्युन्सिपल कोर्ट व नंतर हायकोर्ट सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर येथे दिवाणी व फौजदारी स्वरुपाची विविध न्यायालये सुरू झाली. 

लोकसंख्या वाढ व दावे खटले यांच्या संख्येत वाढ झाल्याने तसेच सर्व शासकीय कार्यालये जवळजवळ असावीत या उद्देशाने शासनाने सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे 24 कोटी रुपये खर्च करुन न्यायालयाची नवीन इमारत बांधली आहे. रविवारी या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. सोमवारपासून नवीन इमारतीत न्यायालयीन कामकाज सुरू  होणार आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जुन्या इमारतीचा निरोप समारंभ कार्यक्रम वकील संघटनेने आयोजित केला होता. या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिष्ट होते.  

अ‍ॅड. व्ही. एस. वाळूजकर म्हणाले, सांगलीतील या न्यायालय इमारतीला ऐतिहासिक महत्व आहे. अनेक दिग्गज न्यायाधीश व वकिलांच्या कामकाजामुळे या न्यायालयाचा नावलौकिक राज्यभर आहे. अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, एस. एस. पाटील, खाडीलकर, अ‍ॅड. व्ही. जे. ताम्हनकर, रेठरेकर अशा अनेक वकिलांनी त्यांच्या वकिली कामकाजातून वेगळा ठसा व आदर्श उमटवला आहे.ते म्हणाले, न्या. सी. डी. सावंत, न्या. सावकार असे अनेक नामांकित न्यायाधीश सांगलीला लाभले. त्यांच्या काळात जास्तीत जास्त चार दिवसात सेशन कमिट खटल्यांचे कामकाज पूर्ण व्हायचे. अ‍ॅड. हरिष प्रताप म्हणाले, सांगलीच्या या न्यायालयात गाजलेल्या खटल्यांची संख्या मोठी आहे. येथील वकिलांनी देखील जलद गतीने न्याय देण्यासाठी न्यायाधीशांना मदत केलेली आहे.   

जुन्या इमारतीत न्यायालयीन कामकाजात भरीव योगदान केल्याबद्दल ज्येष्ठ वकील एस. व्ही. बापट, अ‍ॅड. श्रीकांत जाधव, अ‍ॅड. सुधीर खाडे, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अ‍ॅड. व्ही. जे. ताम्हनकर, अ‍ॅड. एच. जी. खाडीलकर माजी जिल्हा सरकारी वकील वसंतराव मोहिते व अशोक वाघमोडे, वकील संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश भोसले व प्रताप हारुगडे,अ‍ॅड. ए. बी. मुरसल,  अ‍ॅड. मंजुषा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. जी. भोसले, वकील संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, अ‍ॅड. किरण रजपूत, अ‍ॅड. सत्यजित शेगुणशे यांच्यासह सर्व न्यायाधीश  उपस्थित होते. अ‍ॅड. सचिन पाटील यांनी स्वागत केले. अ‍ॅड. प्रमोद भोकरे यांनी सूत्रसंचालन केले.