Tue, Jul 16, 2019 14:06होमपेज › Sangli › त्या अनोळखी महिलेचा खून पैशांच्या वादातून

त्या अनोळखी महिलेचा खून पैशांच्या वादातून

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 11:40PMविटा : वार्ताहर

ढवळेश्‍वर (ता. खानापूर) येथे आठ महिन्यांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. कोमल हणमंत वाघमारे (वय 25, सध्या रा. मलकापूर, कराड, मूळ रा. इंदापूर) असे तिचे नाव आहे. व्यवसायातील कमिशनच्या पैशांच्या वादातून तिचा खून झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. पोलिसांनी संशयित  नवनाथ बबन सूर्यवंशी (वय 40, मूळ रा. डोर्लेवाडी, बारामती, सध्या रा. विटा) याला अटक केली आहे. याबाबत विटा पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. त्या पोलिसांनी दिलेली 

माहिती अशी : ढवळेश्‍वर  येथील विकास कारंडे यांच्या शेतात  आठ महिन्यांपूर्वी या महिलेचा मृतदेह आढळला होता. तो पूर्ण सडल्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटविणे अवघड झाले होते. परंतु घटनास्थळावर पडलल्या वस्तू आणि मिसिंग रजिस्टरवरुन तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. 

कोमल वाघमारे  असे  तिचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा खून झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली होती. परंतु संशयित सापडत नव्हता.  तिच्या संपर्कात असणार्‍या लोकांकडे तपास केल्यावर येथील विवेकानंदनगरमधील नवनाथ बबन सूर्यवंशी हा गुन्हा घडल्यानंतर फरार असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मूळ गावी म्हणजे डोर्लेवाडीसह बारामती,कोलकत्ता, फोंडशिरस,वडगाव या ठिकाणी छापे टाकलेे. परंतु तो सापडला नाही.

नवनाथ  ढाब्यावर आचारी म्हणून काम करीत असल्याचे कोलकत्ता येथे तपास करताना आढळले. तसेच तो अहमदनगर येथे असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अहमदनगर शहरातील ढाब्यांची तपासणी केली. त्यावेळी तो सापडला. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यावर कोमल वाघमारेचा खून कमिशनचे पैसे न दिल्याने केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या गुन्ह्याचा तपास निरीक्षक रविंद्र पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक धनाजीराव पिसाळ,उपनिरीक्षक नानासाहेब सावंत,हवालदार विलास मुंढे,रविंद्र धादवड, विक्रम गायकवाड,अमोल पाटील,पुंडलिक कुंभार,विवेक यादव यांनी केला.