Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Sangli › पदाधिकारी बदलाच्या ‘परीक्षे’त नेत्यांची कसोटी

पदाधिकारी बदलाच्या ‘परीक्षे’त नेत्यांची कसोटी

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 11:48PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांना सव्वा वर्षे झाली आहेत. इच्छुक व काही नेत्यांनी पदाधिकारी बदलाच्या मागणीत चांगलीच हवा भरली आहे. पदाधिकारी बदलासाठी लेखी मागणीचा प्रकार प्रथमच घडत आहे. इच्छुकांच्या महत्वाकांक्षेला खासदार संजय पाटील यांनी हवा दिली असल्याची चर्चा जोरात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची ‘परीक्षा’ नेत्यांची कसोटी घेणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी होण्याची महत्वाकांक्षा सर्वच सदस्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. नेतेमंडळीही सर्वांना संधी म्हणत वर्ष-सव्वा वर्षात पदाधिकारी बदल करत असतात. ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण वेगळ्या अर्थाने अंमलात आणले जाते. पण त्याकडे फारसे कोणी गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. जिल्हा परिषदेतही सव्वा वर्ष झाल्यानंतर पदाधिकारी बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. जुनपासूनच मागणी सुरू होती. मात्र आधि महापलिका निवडणूक आणि नंतर जिल्हा परिषद!, असे म्हणत वरिष्ठ नेतेमंडळींनी दोन महिने इच्छुकांना टोलवले. महापालिका निवडणूक झाल्यानंतर मात्र आता इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपापल्या नेत्यांकडे बदलाच्या मागणीचा जोर धरला आहे.  

अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘गुडबुक’ मधील आहेत. शिवाय पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ते उमेदवार असणार आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी त्यांना अध्यक्षपदावरून बाजुला करणे किती फायद्याचे व किती तोट्याचे याचे गणित वरिष्ठ नेतेमंडळी घालणार हे निश्‍चित आहे. दूसरीकडे वर्षानंतर दुसरी टर्म सुरू होईल. अध्यक्षपदाचे आरक्षण बदलणार आहे. त्यामुळे संधी मिळाली तर यावर्षीच असे म्हणत बदलाच्या मागणीसाठी खुल्या प्रवर्गातील इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. खासदार संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. शिवाजी डोंगरे हेही स्पर्धेत आहेत. मिरज तालुक्यातील सदस्यांच्या ते संपर्कात आहेत. अन्य तालुक्यातील काही नेत्यांशीही त्यांनी संधान बांधल्याची चर्चा आहे. 

शिवसेना, रयत विकास आघाडी, अजितराव घोरपडे गटाच्या 9 सदस्यांच्या टेकूवर भाजपची सत्ता टिकून आहे. शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर उपाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेत मिळालेले पद पुढे सुरू ठेवणे ही त्या गटाची इच्छा लपून नाही. रयत विकास आघाडीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी तसेच काँग्रेस नेते सी. बी. पाटील हे नेते आहेत. कोणाच्या समर्थकाला संधी द्यायची यावरून या नेत्यांचा कस लागणार आहे. 

भाजपचे आटपाडीचे नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेपासून थोडे अंतर ठेवत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ पवित्रा घेतला आहे. पंचायत समितीत हर्षवर्धन देशुमख आणि जिल्हा परिषदेत ब्रह्मदेव पडळकर अशी राजकीय सोयही त्यामागे असावी, अशी चर्चा आहे. गोपिचंद पडळकर हे मात्र सभापती बंधू ब्रह्मदेव पडळकर यांना बदलण्यास विरोध करणार हे स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेतील पद तरी कायम ठेवावे, अशी त्यांची मागणी राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

जत तालुक्यातून मात्र बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. विद्यमान शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि-पाटील जत तालुक्यातील आहेत.  सभापतीपदासाठी जत तालुक्यातून सरदार पाटील, स्नेहलता जाधव, सुनीता पवार प्रबळ इच्छुक आहेत. आमदार विलासराव जगताप यांनी बदलाच्या मागणीला हिरवाकंदील दाखवल्याचा दावा इच्छुकांचा आहे. मिरज तालुक्यात भाजपचे सात सदस्य आहेत. त्यापैकी शिवाजी डोंगरे हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. प्राजक्ता कोरे, सरिता कोरबू, मनोजकुमार मुंडगनूर हेही सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्याकडे पदाधिकारी बदलाची मागणी लावून धरली आहे.

मिरज पंचायत समितीत माजीमंत्री अजितराव घोरपडे समर्थकाला सभापतीपद मिळू नये यासाठी खासदार गटाने फिल्डिंग लावली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर घोरपडे यांची जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल/नविन निवडीबाबत काय भूमिका राहणार याचीही चर्चा जोरात आहे. पदाधिकारी बदलासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भुमिकेकडे इच्छुक व नेतेमंडळींचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर पॅटर्ननुसार अंशत: बदल होणार की संपूर्ण बदल होणार की काहीच बदल होणार नाही याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

अध्यक्ष, सभापती पदासाठीचे इच्छुक

अध्यक्षपदासाठी इच्छुक : 

डी. के. पाटील (चिंचणी), 

शिवाजी डोंगरे (माधवनगर)

सभापतीपदासाठी इच्छुक :

सरदार पाटील, स्नेहलता जाधव,

सुनीता पवार, मंगल नामद (ता. जत)

संगीता नलवडे (ता. कवठेमहांकाळ)

प्रमोद शेंडगे (ता. तासगाव) 

जगन्नाथ माळी, सुरेखा जाधव    (ता. वाळवा)

प्राजक्ता कोरे, सरिता कोरबू, मनोज मुंडगनूर (ता. मिरज)