Wed, Aug 21, 2019 01:59होमपेज › Sangli › ‘सर्वोदय’साठी दहावेळा तुरुंगात जायची तयारी

‘सर्वोदय’साठी दहावेळा तुरुंगात जायची तयारी

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 24 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

सर्वोदय साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी दहा वेळा तुरुंगात जाण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संभाजी पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले, राजकारणातील जयंतनितीला रोखण्यासाठी वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात सर्वपक्षीय मोट बांधणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत त्याची झलक दिसून येईल. 

पवार म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांना सांगलीत सभा घेता येत नव्हत्या. त्यांच्या सभांवर दगडफेक व्हायची. मात्र, मी पाय रोवून उभा राहिल्यानंतरच सांगलीत विरोधकांचा आवाज मजबूत झाला. तिथपासून ते सांगलीत महाआघाडीची बांधणी केली, तेव्हा आम्ही जयंत पाटील यांना   पालखीत घालून आणले. जनतेने त्यामुळे त्यांना डोक्यावर घेतले. परंतु  विश्‍वासघातकी राजकारणाचा झटका मलाही बसला. 

ते म्हणाले, थेट मैदानात येऊन समोरासमोर न लढता कूटनीतीच्या राजकारणाचा पायंडा पडला आहे. त्यातूनच महाआघाडीच्या काळातच रात्रीत झोपड्या हटविण्यास विरोध केल्याने माझ्यावर आमदार असूनही मनपा प्रशासनाने फौजदारी दाखल  केली. ज्या श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या घरी महाआघाडीची बांधणी झाली, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करायला लावला. गेल्या सांगली विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे उमेदवार माजी महापौर सुरेश पाटील यांना केवळ त्यांच्या कृपेने तीन हजार मतेमिळाली.  

पवार म्हणाले, मात्र या प्रवृत्तीला आम्हीच हद्दपार केले. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना माणसे शोधायची वेळ आली. त्यामुळे कसेबसे काही नगरसेवक निवडून  आले. त्यातही आता  सात गट झाले आहेत. भांडणे लावून झुंजवत ठेवणे हेच त्यांचे कर्तृत्व आहे. आम्ही इतकी वर्षे साथ देऊन आपला  घात होऊ शकतो, तर या लोकांचे काय?  पवार  म्हणाले, आताही पुन्हा काँग्रेसशी आघाडीच्या माध्यमातून तंबूत शिरण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण लोकांनी त्यांची धूर्त नीती ओळखली आहे. आता महापालिका निवडणुकीत त्यांची डाळ शिजणार नाही. जिल्ह्यातच नव्हे तर वाळवा तालुक्यात देखील त्यांना  सळो की पळो करून सोडू. पृथ्वीराज पवार म्हणाले, सर्वोदय कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी पळ काढला. विधानसभा निवडणुकीतही पाठीमागून डाव खेळला. थेट लढाईत आम्ही जिंकणार आहोत. यावेळी नगरसेवक गौतम पवार उपस्थित होते.

Tags : Sangli, Sangli News, Ten times, ready, to jail