Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Sangli › नागरिकांनी पकडला हाडे असलेला टेम्पो

नागरिकांनी पकडला हाडे असलेला टेम्पो

Published On: Aug 15 2018 1:25AM | Last Updated: Aug 14 2018 11:10PMमिरज : प्रतिनिधी

मिरज-बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कत्तलखान्याजवळ उघड्या गोदामामध्ये जनावरांची हाडे टाकण्यासाठी आलेला टेम्पो नागरिकांनी  पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत तिघांविरुद्ध महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

वीस वर्षांपूर्वी तत्कालीन मिरज नगरपालिकेने कत्तलखान्याजवळ जनावरांची हाडे साठविण्याकरिता काही व्यापार्‍यांना परवानगी दिली होती; परंतु या परवान्याची मुदत संपली असतानाही संबंधित व्यापार्‍यांकडून या ठिकाणी मोठ्या जनावरांच्या हाडांचा साठा करण्यात येत आहे. त्यांची दुर्गंधी या परिसरात पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी टाकळी, बोलवाड आणि वड्डीमधील ग्रामस्थांनी विरोध करून गोदाम बंद करण्यास भाग पाडले होते. महापालिकेने  कारवाई करून नोटीस दिली; मात्र काही दिवसांनी पुन्हा रात्रीच्या वेळी वाहनांतून हाडे आणून त्या ठिकाणी साठा करण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले होते.

मंगळवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथून एका टेम्पोतून मोठ्या जनावरांची सुमारे 900 किलो हाडे आणण्यात आली होती. हाडे टाकण्यासाठी टेम्पो आल्याचे समजल्यावरून भाजपचे पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, बोलवाडचे सरपंच सुहास पाटील, महादेव दबडे यांच्यासह परिसरातील नागरिक कत्तलखान्याजवळ मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी टेम्पो अडवून ठेवला. या टेम्पोमध्ये  जनावरांची हाडे आणि मुंडकी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जमाव संतप्त बनला होता. यावेळी तिथे आलेल्या उपायुक्त स्मृती पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे यांना घेरावोही घालण्यात आला होता.

डॉ. आंबोळे यांनी  बेकायदेशीररित्या हाडे साठवणुकीसाठी आलेला टेम्पो मिरज ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केला. तसेच या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधीत तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, किरण बंडगर, सुहास पाटील आणि महादेव दबडे यांनी बेकायदा हाडे साठवणूकप्रकरणी  डॉ. आंबोळे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलिसांत केली आहे.