Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Sangli › टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्ता रोको

टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्ता रोको

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 26 2018 12:40AMकडेगाव : शहर प्रतिनिधी

कडेगाव तलावाचा टेंभूच्या लाभक्षेत्रात समावेश करावा, टेंभूच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी येथे विजापूर-गुहागर  राष्ट्रीय महामार्गावर संतप्त शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत चर्चा झाली.  टेंभूचे वरिष्ठ अधिकारी रेड्डीयार आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे  यांनी आंदोलनकर्ते व उपोषणकर्ते शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर रास्तारोको आंदोलन व बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले. 

कडेगाव तलाव टेंभू सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश करावा,शेतकर्‍यांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची पावती पाटबंधारे खात्याकडून मिळावी, योजनांची आवर्तने वेळेत सुरू ठेवावीत, अशा विविध मागण्यांसाठी  शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या  उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. गेले तीन दिवस झाले तरीही प्रशासन याकडे गंभीर्याने पाहत नव्हते. शहरात डेंग्यूची साथ वाढत चालली आहे, तसेच शुद्ध  पाणी पुरवठा होत नाही याकडे कोणाचे लक्ष नाही.याच्या निषेधार्थ आज सकाळी  संतप्त शेतकरी येथील बसस्थानक चौकात एकत्र जमले.  राष्ट्रीय महार्गावर त्यांनी रास्तारोको आंदोलन  केले.रास्तारोकोमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी पाणी टंचाई बाबत तीव्र प्रतिक्रिया  व्यक्त केल्या. 

टेंभूचे वरिष्ठ अधिकारी रेड्डीयार , सहाय्यक अधिकारी एन.आर घार्गे यांनी आंदोलकांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या. सुरली-कामथी कालव्यातून चारही आवर्तने वेळेत सोडली जातील.कडेगाव तलावात कायमस्वरूपी गरजेनुसार पाणी सोडण्यात येईल.पाणीपापट्टी कपात केलेल्या शेतकर्‍यांची नावे प्रत्येक ग्रामपंचायतीत  , तसेच नगरपंचायतीमध्ये  लावण्यात येतील असे अधिकार्‍यांनी सांगितले. श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव, धनंजय देशमुख ,अरुण देशमुख, संतोष डांगे, मुकुंद कुलकर्णी, शशिकांत रास्कर, अनिल देसाई, सुनील मोहिते, राहुल चन्ने   यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कडेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. एस. पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.