Tue, Sep 25, 2018 14:56होमपेज › Sangli › नियोजनाअभावी टेंभूचे पाणी रानोमाळ 

नियोजनाअभावी टेंभूचे पाणी रानोमाळ 

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 7:54PMकडेगाव  ः संदीप पाटील               

अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे टेंभू योजनेचे पाणी रानोमाळ जात आहे. त्यामुळे या पाण्यापासून बहुतांशी शेतकरी वंचित राहत आहेत. याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

एका  बाजूला  पोटकालवे ओसंडून वाहत आहेत. दुसर्‍या बाजूला याच योजनेचे पोटकालवे कोरडे ठणठणीत पडले असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी पोटकालव्याची कामेही अपूर्ण आहेत. झालेली कामेही निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. काही ठिकाणी पोटकालव्यांना भगदाड  पडल्याने पाणी रानोमाळ जात आहे.

तसेच काही ठिकाणी पोटकालव्याचे दरवाजे चोरीला गेले आहेत. यामुळे मागील बाजूस असणार्‍या काही शेतकर्‍यांकडून पाणी नेण्यासाठी पोटकालव्यामध्ये वाळू, दगड टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोटकालव्याच्या शेवटच्या टोकाला असणार्‍या शेतकर्‍यांना पाण्याची वाट पाहण्यापलीकडे काहीच करता येऊ शकत नाहीत. शेतकर्‍यांनी हा प्रकार टेंभू योजनेच्या अधिकार्‍यांना वेळोवेळी लक्षात आणून दिला आहे. अधिकार्‍यांनी या ठिकाणच्या पोटकालव्याची पाहणी केली जाते. पण त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही.