Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Sangli › टेंभू योजनेची कामे रखडली

टेंभू योजनेची कामे रखडली

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 05 2018 8:52PMकडेगाव : संदीप पाटील                  

टेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे अमरापूर, चिखली भागात रखडली आहेत. याचा  शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्‍यांनी पोटकालव्यांची ही रखडलेली कामे सुरू करण्याची वेळोवेळी मागणी करुन देखील त्याकडे  अधिकारी  दुर्लक्ष करीत आहेत. याचा शेतकर्‍यांना मोठाच फटका बसू लागला आहे. टेंभूच्या पोटकालव्यांवर शेकडो एकर उसाचे क्षेत्र अवलंबून आहे. परंतु योजनेच्या  प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.   

या भागात मोठ्या प्रमाणावर पोटकालव्यांची कामे अपूर्ण  आहेत. तसेच केलेली कामे निकृष्ट असल्याने अनेक ठिकाणी पोटकालव्यांचे बांधकाम ढासळले आहे. त्यामुळे पाणी सुरू असते त्यावेळी नियोजनाअभावी पाणी रानोमाळ जात असते. जमिनी वर व पोटकालवे खोलात अशी रचना झाल्याने शेतीला पाणी देणेही  अवघड होऊन बसले आहे.

बहुतांश ठिकाणच्या पोटकालव्याच्या दरवाज्यांना दारे नसल्याने काही शेतकर्‍यांनी दगड, मुरूम टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला  आहे. त्यामुळे पोटकालव्यात सध्या मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा थर साचला आहे. या पोटकालव्यांची कामे गेल्या काही वर्षभरापूर्वी झाली आहेत.

अधिकार्‍यांनी त्यांची पाहणी करुन देखील या पोटकालव्याच्या दुरूस्ती कामास सुरुवात झालेली नाही. लाभार्थी शेतकर्‍यांकडून  पाणीपट्टीची रक्कम मात्र विनासंमती  कपात करून घेतली जाते. लवकरात लवकर या पोटकालव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होऊ लागली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.

पोटकालव्यांचे दरवाजे चोरीला 

या भागात असणार्‍या बहुसंख्य पोटकालव्यांचे दरवाजे चोरीला गेले आहेत. तर पोटकालव्यांतून शेतात पाणी नेण्यासाठी शेतकरी दगड, विटा, मुरूम टाकून पाणी अडवित असल्याने अनेक ठिकाणी पोटकालव्यात दगड, विटांचा ढीग लागला आहे. अनेक ठिकाणी पोटकालव्याभोवती उगवलेली झाडे, झुडुपे यामुळे पोटकालवे काही ठिकाणी मुजून गेले आहेत.