Mon, Aug 19, 2019 01:04होमपेज › Sangli › संवर्ग १ व २ चे ‘लाभार्थी’ चौकशीच्या फेर्‍यात 

संवर्ग १ व २ चे ‘लाभार्थी’ चौकशीच्या फेर्‍यात 

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 10:20PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये खोट्या माहितीद्वारे सोयीच्या बदलीचा लाभ घेतलेले शिक्षक चौकशीच्या फेर्‍यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी कागदपत्रांच्या पडताळणीचे, कारवाईचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. ग्रामविकास विभागानेही यापूर्वीच तसे स्पष्ट केलेले आहे. 

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आधार घेऊन काही शिक्षकांनी संवर्ग 1 अंतर्गत बदलीच्या लाभासाठी खोटी माहिती भरल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला. खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतलेले शिक्षक, गंभीर आजार नसतानाही तसे प्रमाणपत्र देणारे  डॉक्टर यांची चौकशी होईल, असेही राऊत यांनी सांगितलेले आहे.    

शिक्षक बदल्यांमध्ये संवर्ग 1 (गंभीर आजार, अपंग, विधवा, परित्यक्‍ता, कुमारिका, मतिमंद मुलांचे पालक, 53 वर्षांवरील शिक्षक) व संवर्ग 2 (पती-पत्नी एकत्रीकरण) च्या लाभासाठी माहिती सादर केलेल्या शिक्षकांच्या संबंधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. बदली अधिकार पात्रमध्ये  संवर्ग 2 हा ‘पती-पत्नी एकत्रिकरण’चा आहे. पती-पत्नी एकत्रिकीकरणसंदर्भात यापूर्वीच्या शासन निर्णयात स्पष्टता आहे.

पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद सेवेत तर दुसरी व्यक्‍तीही त्याच जिल्हा परिषद सेवेत अथवा खासगी शाळा, राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी अथवा खासगी संस्थेत सेवेत असलेले असे नमूद होते. मात्र, नवीन शासन निर्णयात पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद व दुसरी व्यक्‍तीही जिल्हा परिषद सेवेत  अथवा ‘इतर’ असे नमूद आहे. ‘इतर’ म्हणजे नेमके काय? त्याची स्पष्टता नसल्याचा लाभ उठवत काहींनी पळवाटा शोधत बदलीचा लाभ घेतल्याची चर्चा आहे. दोन टप्प्यात 2559 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. आता रिक्‍त पदांचे समानीकरण, शून्य शिक्षकी व एक शिक्षकी शाळांवर शिक्षक पदस्थापना, तसेच विस्थापितांना पदस्थापनेसाठी आणखी दोन फेर्‍यात किमान 300 शिक्षकांच्या बदल्या होतील, असे संकेत मिळत आहेत. 

70 शिक्षकांनी आजाराची खोटी माहिती दिली

सोयीच्या बदलीसाठी खोटी माहिती भरून अन्य शिक्षकाला विस्थापित केलेल्या शिक्षकांवर काय कारवाई होणार, असा सवालही काही सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यावर जिल्ह्यातील 70 शिक्षकांनी गंभीर आजाराची खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतली असल्याचा गौप्यस्फोट मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी केला.