Wed, Nov 14, 2018 23:20



होमपेज › Sangli › संशयित मोरेच्या पत्नीकडे चौकशी

संशयित मोरेच्या पत्नीकडे चौकशी

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 11:29PM



सांगली : प्रतिनिधी

येथील शास्त्री चौकात झालेल्या सुनील आंबी या शिक्षकाच्या खूनप्रकरणातील संशयित  प्रमोद मोरे याची पत्नी सुमिताकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. दरम्यान तिच्याकडील चौकशीत महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तिचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान यातील संशयित लोकेश नाईकसह दोघे अद्यापही गायब आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.  

याप्रकरणी आतापर्यंत गुंड रवि खत्री, हॉटेल डायमंडचा वेटर राकेश चव्हाण, सुहास ऊर्फ तम्मा ऐवळे, प्रदीप मोरे यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी कार जप्त केली आहे.    

सुनिल आंबी हे विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक होते. त्याच शाळेत मोरेची पत्नी शिक्षिका आहे. संशयित प्रमोद मोरेने पत्नीला आंबी त्रास देत असल्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिस सुमिता मोरेच्या शोधात होते. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून त्या बेपत्ता होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्याचे सांगण्यात आले. त्यातून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

सुनील आंबी आणि त्या एकाच शाळेत शिक्षक आहेत. दोघेही सहकारी असल्याने त्यांच्यात कामानिमित्त बोलणे होत होते. सहकारी असल्याने व्हॉटसअ‍ॅपवर मेसेजची देवाण-घेवाणही होत होती. आंबी यांच्याशी केवळ एक सहकारी म्हणूनच संबंध असल्याचे सुमिता मोरे यांनी सांगितल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. दरम्यान त्यांचा मोबाईल पोलिसांनी तपासासाठी जप्त केला आहे.    
दि. 26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आंबी यांना  मोबाईलवर फोन करून चर्चा करायचे असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर संशयितांनी त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यानंतर  नाईकच्या कारमध्ये त्यांना घालून शंभर फुटी रस्ता परिसरात जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले.  त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दि. 4  जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांवर खुनासह दरोडा आणि चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.