Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Sangli › सहा वर्षे भरती नाही; ‘टीईटी’चा मात्र सपाटा

सहा वर्षे भरती नाही; ‘टीईटी’चा मात्र सपाटा

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:47PMसांगली : प्रतिनिधी

गेली सहा वर्षे शिक्षक भरती झाली नाही. शिक्षक पदाच्या नोकरीसाठी आवश्यक ‘महाटीईटी’ परीक्षांचा मात्र सपाटा सुरू आहे. दि. 8 जुलै 2018 रोजी ‘महाटीईटी’ आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 25 एप्रिल ते 15 मे आहे. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील दहावीपर्यंतच्या शिक्षकांची एक हजार पदे रिक्त आहेत. शासनाने केवळ ‘महाटीईटी’ परीक्षाच न घेता शिक्षक भरतीचा मुहुर्तही तातडीने शोधणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर सोपविलेली आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: महाटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेले आहे.  

गेल्या तीन वर्षात तीन महाटीईटी  झाल्या आहेत. आता दि. 8 जुलै 2018 रोजी चौथी महाटीईटी होणार आहे. शासनाने ‘महाटीईटी’चा सपाटा लावला आहे. मात्र शिक्षक भरतीबाबत काहीच हालचाली दिसत नाही. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका प्राथमिक शाळांकडील शिक्षक भरतीसाठी सन 2011 मध्ये सीईटी झाली होती. त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांकडील शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी परीक्षा झालेली नाही. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. 

सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडे शिक्षकांची 625 पदे रिक्त आहेत. खासगी प्राथमिक शाळांकडेही शिक्षकांची 100 हून अधिक पदे रिक्त आहेत. माध्यमिक शाळांकडे शिक्षकांची 274 पदे रिक्त आहेत. हीच परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांचीही आहे. मात्र शिक्षक भरतीबाबत शासन पातळावर हालचाली दिसत नाहीत. 

सन 2011 मध्ये राज्यभर शाळांची पटपडताळणी झाली. बोगस पटाचा व त्या अनुषंगाने अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत भरती बंदीचा आदेश दि. 2 मे 2012 रोजी निघाला. त्यानंतर भरतीबंदीवरील निर्बंध शिथिल झाले. मात्र राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न अजुनही पूर्णपणे संपलेला नाही (सांगली जिल्ह्यात हा प्रश्‍न संपला आहे.) त्यामुळे भरतीवर निर्बंध आहेत. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने डिसेंबरमध्ये अभियोग्यता व बुध्दीमत्त चाचणी परीक्षा झाली आहे. मात्र भरतीच्या अनुषंगाने हालचाली दिसत नाहीत. शासनाने तातडीने भरती प्रक्रियाही सुरू करणे गरजेचे आहे.  

Tags : sangli,Teachers, recruited, no  past six year, sangli news,